Wed, May 22, 2019 06:33होमपेज › Jalna › जालना तालुक्यातील 51 गावांना गारपिटीचा फटका

जालना तालुक्यातील 51 गावांना गारपिटीचा फटका

Published On: Feb 12 2018 1:50AM | Last Updated: Feb 12 2018 12:21AMजालना : प्रतिनिधी

बोंडअळींमुळे कापसाच्या नगदी पिकाने शेतकर्‍यांना दगा दिला. हवालदिल शेतकरी नव्या जोमाने रब्बी हंगामात तरी झालेले नुकसान भरून निघेल, या अपेक्षेने कामाला लागला. रविवारी (दि. 11) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पिके डोलत असताना वातावरणाने कलाटणी घेत वादळीवार्‍यासह झालेल्या गारपिटीच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. याचा फटका तालुक्यातील 51 गावांना बसला आहे. 

शेतकर्‍यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक गणित हे खरीप हंगामावर विसंबून असते; पण या वेळी कधी नव्हे त्या प्रमाणात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने कापसाच्या नगदी पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाला. ज्यामुळे कापसाच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली तर असंख्य शेतातील कापसाची एकाच वेच्यात उगवली. दुसरीकडे तुरीच्या पिकानेही पाहिजे तेवढी साथ शेतकर्‍यांना दिली नाही. विशेषतः आजही शेतकरी झालेल्या नुकसानीसाठी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. या लक्षणीय नुकसानीतून स्वतःला सावरत खरीप हंगामामधील झीज रब्बी हंगामात भरून निघेल, या अपेक्षेने शेतकरी नवीन जोमाने कामाला लागला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे.

आजमितीला शेतातील रब्बी हंगामात लावलेला गहू, हरबरा, ज्वारी यांसारखी पिके डोलू लागली आहेत. ही पिके तरी पूर्ण हाती येईल, अशी अपेक्षा असताना रविवारी वादळीवार्‍यासह गारपिटीचा पाऊस झाल्याने क्षणातच शेतकर्‍यांचे स्वप्न भंगले. या गारपिटीचा फटका तालुक्यातील द्राक्षे, मोसंबी, डाळिंब या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा, कांदा यांसह भाजीपाला पिकांना बसला आहे. तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर, पीरपिंपळगाव, तांदूळवाडी, वंजार उम्रद, गोंदेगाव, तांदूळवाडी, धावेडी, थार, वाघु्रळ, कुंभेफळ, वरखेडा, इंदलकरवाडी, कुंभेफळ, पोखरी, कडवंची, नंदापूर, वरूड, नाव्हा, रेवगाव, गोलापांगरी यांच्यासह अन्य गावांत गारपीट झाली.