Wed, May 22, 2019 22:48होमपेज › Jalna › पाच  महिन्यांत 51 आगीच्या घटना 

पाच  महिन्यांत 51 आगीच्या घटना 

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:27PMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

यंदा जानेवारी महिन्यपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती.  मे महिन्यात तापमानाचा पारा 43 अंशापर्यंत पोहचला. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत शहरात जवळपास 51 आगीचा घटना घटल्या. तसेच तलाव, विहिरीतून मृतदेह काढण्याच्या 15 घटना  घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आगीच्या घटनेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा पारा 40 अंशांपर्यत पोहचला होता. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी तापमान सातत्याने 41 व 42 दररोज राहत असल्याने सकाळी दहा वाजेपासून ऊन जाणवत होते. 15 ते 19 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट आल्याने उष्णतेचा पारा 43.5 अंशांवर जाऊन पोहचला होता. या वाढत्या उष्णतेमुळे शहरात व परिसरात आगीच्या घटना जास्त घडल्या आहेत. 15 जानेवारी ते 30 मेपर्यंत तब्बल 51 घटना घडल्या. या घटनामध्ये तीन घटना भीषण होत्या. गॅरेज (बसस्थानक परिसर), घराला आग (मोतीवेस) व दहा दुकानांना (मंठा चौफुली) भीषण आग लागली होती. या आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन बंबांच्या साह्याने आग विझविण्यात आली.  

एप्रिल महिन्याप्रमाणे मे महिन्यात आगीच्या घटना जास्त घडत असून, जवळपास 28 घटना घडल्या आहेत. यावर्षी शहरासह ग्रामीण भागात कडब्याला आगीचा घटना मोठ्या प्रमाणात घटत आहे. शहरासह तालुक्याच्या भार हा पालिकेच्या अग्निशमन विभागावर असून, 50 किलोमीटर अंतरावर काही गावे असल्याने अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागते. यात कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागते. कर्मचार्‍यांना फायरप्रुफ ड्रेस नसल्याने सिव्हिल ड्रेसवरच आग विझवावे लागते. अग्निशमन विभागाला आगीच्या घटनाबरोबर तलाव, विहिरीतून मृतदेह काढण्याच्या 15 घटना घडल्या आहेत.  गतवर्षी फक्त दोन घडना घडल्या होत्या.

यावर्षी तापमान 44 अंशांपर्यत पोहचले होते. यामुळे आगीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात कडबा गंजी,  कार, झाडाला, गोदाम,  दुकान, गॅरेज, चायनीज हॉटेल, कचर्‍याचे ढिगार, कापसाचे टेम्पो, कपड्याचे दुकान आदी घटनांचा समावेश आहे.

उन्हाळ्यात आगीच्या घटना 

तापमान जास्त असल्याने वायरमध्ये बिघाड होऊन शॉटसर्किटमुळे आगीच्या घटना घडतात. एप्रिल महिन्यात तापमान जास्त असल्याने आगीच्या घटना जास्त घडल्या आहे. दोन घटना मोठ्या होत्या. यावर्षी तलाव, विहिरीतून मृतदेह काढण्याच्या 15 सर्वाधिक घटना घडल्या आहे. पावसाळ्यात ही शॉटसर्किटमुळे आगीच्या घटना घडतात. आग लागल्यास तत्काळ अग्निशमन विभागाला तत्काळ कळवावे, असे अग्निशमन विभागाचे अधिकारी पी. एम. जाधव यांनी  दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

विस्तार करण्याची गरज 

शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता अग्निशामक दलातील बंबांची तसेच कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. भविष्याच्या दृष्टीने हा विस्तार शहराच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे. कर्मचार्‍यांना चांगल्या सुविधांबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणार्‍या अग्निशामक दलास अत्याधुनिक सुविधांसोबत दर्जेदार सुरक्षा साधने देणे आवश्यक आहे.