Tue, Mar 19, 2019 20:55होमपेज › Jalna › 45 अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

45 अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMजालना : प्रतिनिधी

 नवीन जालना भागातील शिवाजी पुतळा ते मॉँ जिजाऊ प्रवेशद्वारपर्यत मुख्य रस्त्यालगत असलेली 45 अतिक्रमणे गुरुवारी (दि.22) नगरपालिकेच्या वतीने  हटविण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, पानटपरी, चहा टपरी, झेरॉक्स आदी दुकानांचा समावेश होता. पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

पालिकेच्या वतीने मागील आठवड्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर  गुरुवारी पुन्हा शिवाजी पुतळा भागातील अतिक्रमणावर पालिकेने हातोडा चालवण्यात आला. या मोहिमेत शिवाजी पुतळ्यापासून पोस्ट ऑफिस समोरील झेरॉक्स, हॉटेल्स, गॅरेजसह इतर अतिक्र्रमित दुकाने हटविण्यात आली. या अतिक्रमणात जवळपास दहा ते पंधरा अतिक्रमणे हे पक्के बांधकाम केलेले होते. याशिवाय बाकीचे पानटपरी, गॅरेजचा समावेश होता. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पथकाने सदरचे साहित्य उद्ध्वस्त करून भंगार करून टाकले.

पालिकेच्या वतीने यापूर्वी भोकरदन नाका, गांधी चमन, बसस्थानक रस्ता आदी भागांत अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली होती, मात्र या भागात आता पुन्हा अतिक्रमणे सुरळीत झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या वतीने समोर अतिक्रमण काढले जात असतानाच दुसरीकडे ती पुन्हा काही दिवसांत नियमित होत असल्याने पालिकेची ही मोहीम फार्स ठरत आहे. गुरुवारी जेसीबी, ट्रक्टर व सफाई कामगाराच्या ताफ्याने सकाळी साडेदहाच्या सुमारास मोहीम सुरू केली. या भागातील अतिक्रमणे पक्‍की असल्याने व्यावसायिकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र अतिक्रमण हटावदरम्यान कोणताही विरोध झाला नाही. अतिक्रमण हटाव मोहिमेत पालिकेचे मुख्यधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे, अडसिरे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, महादेव राऊत, शॅमसन कसबे, संजय खर्डेकर, पंडित पवार, अशोक लोंढे, संतोष शिरगुळे, विलास गावडे यांच्यासह 60 कर्मचार्‍यांचा समावेश होता.