Wed, Jul 24, 2019 14:09होमपेज › Jalna › आरटीई सोडतीद्वारे 422 विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

आरटीई सोडतीद्वारे 422 विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 1:53AMजालना : प्रतिनिधी

आरटीई प्रवेशासाठी पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या 1 हजार 320 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 422 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना 4 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विहित मुदतीत प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरणार आहे. त्यांना पुढील कोणत्याही फेरीत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

पहिल्या सोडतीनंतरही 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्‍त राहण्याची स्थिती आहे. यामुळे शासनाने या प्रवेशासाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्याचे पत्र शिक्षण संचालकांनी शुक्रवारी सायंकाळी काढले आहे. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण 2 हजार 872 जागा आहे. यासाठी यंदा 3 हजार 223 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत. एका विद्यार्थ्याची फक्‍त एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. पालकांना एसएमएसद्वारे माहिती कळवण्यात आली असून दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश घेतला नाही, तर पुढील सर्व फेर्‍यांसाठी सदर विद्यार्थी पात्र राहणार नाही.

त्यामुळे लॉटरी जाहीर झाल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागांसाठी पहिल्या फेरीनंतर द्वितीय व तृतीय सोडतही जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत आतापर्यंत 422 प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांना एप्रिलपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावे लागणार आहेत. 4 एप्रिलपर्यंत प्रवेश न घेतल्यास अपात्र ठरणार आहे. संस्थाचालकांकडून होणार्‍या अडवणुकीमुळे अनेकांचे प्रवेश रखडले आहे. प्रवेश नाकारणार्‍या संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

Tags : jalna, jalna news, 422 students,  admission, RTE draw