Fri, May 24, 2019 21:33होमपेज › Jalna › ३३ लाखांचे मौल्यवान दगड जप्‍त

३३ लाखांचे मौल्यवान दगड जप्‍त

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 11:56PMजालना : प्रतिनिधी

जालना -राजूर रस्त्यावरील दगडवाडी येथे शेतातून अवैधरीत्या उत्खनन करून 33 लाखांच्या मौल्यवान दगडा (मॉस एगट)ची विक्री करणार्‍या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि.26) रात्री अकरा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हा हिरवा दगड सापडतो. या दगडापासून मौल्यवान खडे बनविले जात असल्यामुळे तसेच आंंतरराष्ट्रीय बाजारात या दगडाला मोठी किंमत मिळत असल्याने अवैध उत्खनन करून हा दगड काढण्याचा प्रकार ग्रामीण भागात  मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जालना -राजूर रस्त्यावरील दगडवाडी शिवारात अवैधरीत्या मौल्यवान दगड काढण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकार्‍यांनी खनीकर्म अधिकारी संदीप पाटील यांच्यासोबत खासगी वाहनाने दगडवाडी येथे जाऊन छापा टाकला. यावेळी शिवाजी दामोदर कातुरे, रामेश्‍वर दामोदर कातुरे, ज्योतीराम बाबासाहेब माने, शरद मच्छिंद्र कदम, गोपीचंद पंढरीनाथ कदम (सर्व रा. दगडवाडी)यांच्या ताब्यातून 33 लाख 20 हजार रुपयांचा 8 टन 300 किलो मौल्यवान दगड जप्‍त करण्यात आला. हा दगड जागेवर 4 लाख रुपये टन या भावाने विक्री करण्यात आला होता.

या मौल्यवान दगडाचा वापर दागिन्यातील स्टोन बनविण्यासाठी केला जातो. मध्यस्थी व्यापारी ग्रामीण भागातून हा दगड जरी 4 लाख रुपये टन घेत असले तरी प्रत्यक्षात महानगरात या दगडाची किंमत चौपट असून आंतरराष्ट्रीय बाजारात दगडास त्यापेक्षा जास्त भाव आहेत. चीनमध्ये या दगडाला पॉलिश करून त्याचे खडे बनविले जातात. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, सदाशिव राठोड, किरण मोरे यांच्यासह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश गावडे, पोलिस उपनिरीक्षक गिरासे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी केली.