होमपेज › Jalna › 3 लाख नागरिकांची तहान अजूनही टँकरवर

3 लाख नागरिकांची तहान अजूनही टँकरवर

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 2:09AMजालना : प्रतिनिधी 

या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतानाच तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही सर्वदूर पाऊस पडलेला नाही. भरपावसाळ्यात जिल्ह्यातील 132 गावे व 19 वाड्या तहानलेल्याच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 2 लाख 90 हजार लोकांची तहान भागविण्यासाठी तब्बल 154 टँकर पाण्याच्या फेर्‍या करीत आहेत. 

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मान्सूनमध्ये पावसाने नेहमीप्रमाणे दडी मारली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही खरिपाच्या पेरण्या लांबल्या. आज पडेल उद्या पडेल असे वाटत असतानाच पंधरा दिवस उलटूनही रूसलेला पाऊस पडण्यास तयार नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे. पावसाच्या जुगारावर दरवर्षी लावल्या जाणारा बी-बियाणे व खताचा सट्टा या वर्षीही तरी लागणार का? या प्रश्‍नाने शेतकर्‍याला कोड्यात टाकले आहे. जिल्ह्यात उन्हाळा न संपल्याने 132 गावे व 19 तांड्यात राहणार्‍या 2 लाख 90 हजार 618 लोकांची तहान 154 टँकर भागवत आहे. त्यासाठी 375 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जालना तालुक्यातील 40 हजार लोकसंख्येच्या 13 गावे व 1 वाडीसाठी 20 टँकर, बदनापूर 55 हजार 959 लोकसंख्येच्या 24 गावे व 7 वाड्यासाठी 24, भोकरदन 1 लाख 16 हजार 464 लोकसंख्येच्या 47 गावे व 5 वाड्यासाठी 58, जाफराबाद 39 हजार 509 लोकसंख्येच्या 25 गावे व 1 वाडीसाठी 27, परतूर 4 हजार 181 लोकसंख्येच्या 2 गावे व 1 वाडीसाठी 3, मंठा 23 हजार 775 लोकसंख्येच्या 14 गावे व 1 वाडीसाठी 14, अंबड 2 हजार 850 लोकसंख्येच्या 3 गावासाठी 4, घनसावंगीं 7 हजार 379 लोकसंख्येच्या 4 गावे व 3 वाड्यासाठी 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तहानलेले नागरिक पावसाची चातक पक्षाप्रमाणे प्रतिक्षा करीत आहेत.