Thu, Apr 25, 2019 06:01



होमपेज › Jalna › 64 प्रकल्पांत साडेतीन टक्के साठा

64 प्रकल्पांत साडेतीन टक्के साठा

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 01 2018 10:38PM



जालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 7 मध्यम व 57 लघु प्रकल्पांंत 28 जूनपर्यंत केवळ 3.67 टक्के उपयुक्‍त जलसाठा आहे. पाऊस न पडल्याने 1 मध्यम व 15 लघु असे 16 प्रकल्प कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

या वर्षी पावसाने ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 1 प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला असून एका प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आली आहे. पाच प्रकल्पांत 0 ते 25 टक्के जलसाठा आहे. 57 लघु प्रकल्पांपैकी 15 प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर 33 प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. 9 प्रकल्पांत 0 ते 25 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात मोठे पाऊस न झाल्याने नदी, ओढे, तलाव कोरडेच आहेत. विहिरींनीही तळ गाठला असून हातपंप कोरडे पडल्याने दीडशेच्या वर टँकर नागरिकांची तहान भागविण्यासाठी धावत आहेत. जिल्ह्यात रविवार 1 पर्यंत केवळ 104 मि. मी. पाऊस पडला असून पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

येत्या काही दिवसांत मोठे पाऊस न पडल्यास तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत टंचाईची परिस्थिती भीषण आहे. जनावरांचा चारा संपल्याने चार्‍याचे भाव वाढले आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे.