Thu, Jun 27, 2019 15:52होमपेज › Jalna › डिजिटल व्यवहारांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ

डिजिटल व्यवहारांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:54AMजालना : प्रतिनिधी

नोटाबंदीनंतर मोठ्या गाजावाजा करत डिजिटल व्यवहार सुरू झाले. मात्र काही महिन्यांतच स्थिती पूर्ववत होऊन नागरिक रोख स्वरूपातच खरेदी करीत आहेत. मात्र गत दोन आठवड्यांपासून एटीएममध्ये रक्‍कम नसल्याने अनेकांनी पुन्हा डिजिटल व्यवहार सुरू केले आहे. जालना शहर जिल्हा मिळून सुमारे 25 ते 30 टक्के व्यवहार डिजिटल स्वरूपात होत असल्याचे व्यापारी तसेच काही बँक 
अधिकारी सांगतात. 

यात प्रामुख्याने स्वाईप मशीनसोबतच डिजिटल वॉलेट व ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर वाढला आहे. ऑनलाइन मनी ट्रान्सफरद्वारे व्यवहार वाढले आहेत. जालना शहरात 70 पेक्षा अधिक एटीएम आहेत. एटीएममध्ये चलन नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या व्यवहारांमध्ये सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले. डिजिटल व्यवहार वाढले असले तरी स्वाईप मशीन वापरावरही मर्यादा असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. सततच्या वापरामुळे मशीन हँग अथवा रेंज नसणे आदी प्रकार वाढत आहेत. 

स्वाईप मशीनवर ठराविक रक्‍कम अदा केल्यावर उर्वरित रक्‍कम धनादेशाद्वारे ग्राहक देत आहेत. परिणामी ग्राहकांना वेळेत वस्तू उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे.राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट असल्याने भर उन्हात पैशांसाठी पळत फिरावे लागत आहे. एटीएममधील चलनटंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसला असला तरी डिजिटल व्यवहार करणार्‍या वॉलेट कंपन्यांना फायदा होत आहे. मोबाइल, फोन, वीज, गॅस कनेक्शन यांसह इलेक्ट्रॉनिक्स, किराणा आणि अन्य वस्तूंच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार होत आहे. मात्र, बँकांच्या डेबिट कार्डद्वारे संबंधित बँकेांच्या सूचनेनुसार विशिष्ट प्रमाणातील रकमेचेच व्यवहार करता येतात.

मोठ्या व्यवहारांसाठी संबंधित ग्राहक काही डिजिटल पेमेंट आणि उर्वरित रक्‍कम एटीएममधून काढत होते. मात्र, सध्या एटीएममध्ये खडखडाट असल्याने ग्राहक केवळ स्वाईप मशीन व धनादेशावर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना स्वाईप मशीनची सेवा उपलब्ध आहे. विशिष्ट रकमेपर्यंत स्वाईप वापरता येते. लाखापुढील रकमेसाठी धनादेश आम्ही स्वीकारत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयराज सुराणा यांनी सांगितले. काही वेळा धनादेश बँकेत जमा केल्यावर रक्‍कम आम्हाला मिळते. त्यानंतर ग्राहकांना वस्तू दिली जाते. 

Tags : Jalna, 25, percent, increase,  digital transactions