Mon, Jan 21, 2019 13:47होमपेज › Jalna › अठरा गावांना २४ टँकरने पाणीपुरवठा 

अठरा गावांना २४ टँकरने पाणीपुरवठा 

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:17AMजालना ः प्रतिनिधी

यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे भर पावसाळ्यात 18 गावे व 3 वाड्यांना 24 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी टँकरची संख्या 54 एवढी होती. मात्र गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे टँकरची सख्या निम्म्यावर आली आहे. 57 लघु व 7 मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प अद्यापही कोरडेच असून एका मध्यम व 44 लघु प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 50 टक्के पाऊस पडला असून अजून मोठ्या पावसाची गरज आहे. 

काही दिवसांपूर्वी पाऊस पडूनही जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अद्यापही समाधानकारक साठा झालेला नाही. येणार्‍या काळात समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 467.82  मि. मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 406.79 मि. मी. पाऊस झाला आहे. पावसामुळे  खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, जलसाठ्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. 24 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात सध्या 7.66 दलघमी (11.18 टक्के) जलसाठा आहे. हाच साठा गेल्या वर्षी 25.11 दलघमी (36.66 टक्के) एवढा होता. 57 लघु तलावांमध्येही सध्या 6.18 दलघमी (3.65 टक्के) एवढा साठा असून गेल्या वर्षी 9.98 दलघमी (5.90 टक्के) साठा होता. त्यामुळे हे प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहे. 

सात मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा, 

जालना : कल्याण गिरीजा 5.48 टक्के, कल्याण मध्यम 15.06 टक्के, बदनापूर : अप्पर दुधना 10.66 टक्के, भोकरदन : जुई मध्यम प्रकल्प 1.16 टक्के, धामना प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली (जोत्याखाली), जाफ्राबाद : जीवरेखा प्रकल्प 30.02 टक्के, अंबड तालुका : गल्हाटी प्रकल्प 15.10 टक्के, एकूण 11.18 टक्के