होमपेज › Jalna › संपामुळे २ कोटी नुकसानीचा दावा

संपामुळे २ कोटी नुकसानीचा दावा

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:19PM



जालना : प्रतिनिधी

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेल्या भारत बंद व चक्का जाम आंदोलनास जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. संपामुळे दोन दिवसांत दोन कोटींचे नुकसान झाल्याचा दावा अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांनी केला.

वर्षातून एकदाच टोलचा कर द्यावा, विम्याचा हप्ता कमी करा यासह जालना जिल्ह्यात ज्याचा माल त्याचा हमाल या व अन्य विविध मागण्यांसंदर्भात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने भारत बंद व चक्काजामची हाक देण्यात आली. शुक्रवारपासून सुरू झालेल्या  संपास शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने  केला. संपामुळे शहरातील दोनशे तर जिल्ह्यातील जवळपास चारशे ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद राहिल्याने एकही ट्रक रस्त्यावर धावली नाही.  

दोन दिवसांत उलाढाल ठप्प झाली.  जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्व ट्रान्सपोर्ट एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. 20 जुलैपासून जिल्ह्यात चक्का जाम करण्यास सुरुवात झाली. ज्यांनी गाड्या भरल्या अशा गाड्या पार्किंगमध्ये लावण्यात येणार असून संप पूर्ण होईपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार नसल्याचे सर्वांनुमते ठरले. बैठकीस सुरेश उपाध्याय, पप्पू नागडा, जुबेर पठाण, पंकज लोहिया, काकडे पाटील, संजय करवा  यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.