Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Jalna › १५ महिन्यांमध्ये  १९८ विवाहित महिला बेपत्ता 

१५ महिन्यांमध्ये  १९८ विवाहित महिला बेपत्ता 

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:11AMजालना : सुुहास कुलकर्णी 

गेल्या पंधरा महिन्यांत तब्बल 198 विवाहित महिला बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता झालेल्या महिलांपैकी पोलिसांनी 62 महिलांचा शोध लावण्यात यश मिळविले असले तरी अद्यापही 134 महिलांचा शोध लागलेला नाही. 86 बेपत्ता पुरुषांपैकी 44  जणांचा शोध  पोलिस यंत्रणा  घेत आहे.

महिला व पुरुषांचे बेपत्ता होण्याच्या घटना गतवर्षी म्हणजे 2017 या वर्षात मोठ्या प्रमाणात घडल्या. या वर्षात तब्बल 170 महिला बेपत्ता झाल्या असल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यात पोलिस प्रशासनाने 60 महिलांचा शोध लावण्यात यश मिळविले तर 110 महिलांचा शोध लावण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आहे. जानेवारी ते मार्च 2018 या तीन महिन्यांच्या कालावधीत महिला बेपत्ता होण्याच्या 28 घटना घडल्या. त्यात केवळ 4 प्रकरणांत पोलिस बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात यशस्वी झाले असून 24  महिलांचा पोलिस यंत्रणा शोध घेत आहे. 

बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात पोलिस यंत्रणेला अत्यल्प यश आले असल्याचे तपासाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. या  महिलांचे पुढे काय झाले, हा प्रश्‍न पोलिस यंत्रणेसह समाजासमोर प्रश्‍नचिन्ह बनून उभा आहे. बेपत्ता महिलांच्या शोधासाठी सामाजिक महिला संघटनांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह आहे.