निना, कॅटरिना, नर्गिस आणि बरीच चक्रीवादळे; ज्यामध्ये गेला लाखोंचा जीव!

Last Updated: Jun 03 2020 12:00PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताला गेल्या 15 दिवसात दोन चक्रीवादाळांनी तडाखा दिला. 20 मे च्या दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान वादळाने तडाखा दिला. तर 3 जून रोजी अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग वादळाने महाराष्ट्र आणि गुजरातला तडाखा दिला आहे. 

विशेष म्हणजे भारताला बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांनी वेढले आहे. त्यातील बंगालच्या उपसागरात सर्वात जास्त वादळे येतात. भारताबरोबच जगात अशी काही ठिकाणे आहेत जेथे वारंवार चक्रीवादळे धडकत असतात. त्यातील काही वादळे कमी तीव्रतेची तर काही जास्त तीव्रतेची वादळे असतात. 

जगभरात काही अशी चक्रीवादळे येऊन गेली आहेत ज्यांनी भरपूर नुकासन केले आहे. या वादळामुळे प्रभावित भागात प्रचंड वेगाने वारे वाहत होते आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. ज्यामुळे त्या भागातील जिवितहानी झाली होती. काही वादळांमुळे मोठी जिवितहानी झाली, तर काही वादळांनी वित्तहानी अशा प्रकारे झाली की प्रभावित भागाला त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्षे लागली. अशाच काही वादळांच्या बाबातीत आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण वादळांची तीव्रता कशा प्रकारे ठरवली जाते हे पाहुया.

वादळांच्या तीव्रतेनुसार त्याची वर्गवारी केली जाते. ही वर्गवारी चक्रीवादळाच्या वेगावरुन ठरण्यात येते.

लेवल 1 : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा 119 ते 153 किमी प्रतीतास असतो.

लेवल 2 : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा 154 ते 177 किमी प्रतीतास असतो. 

लेवल 3 : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा 178 ते 208 किमी प्रतीतास असतो. 

लेवल 4 :  यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा 209 ते 251 किमी प्रतीतास असतो. 

लेवल 5 :  यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा 252 किमी प्रतीतासापेक्षा जास्त असतो. 

जगात विध्वंस घडवणारी काही चक्रीवादळे 

हुगली रिव्हर चक्रीवादळ

या वादळाला होगली किंवा कलकत्ता वादळही संबोधले जाते. हे वादळ इतिहासातील सर्वात विध्वंस करणारे वादळ म्हणून ओळखले जाते. हे वादळ गंगा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच बंगालच्या भागात 11 ऑक्टोबर 1737 रोजी धडकले होते. हे वादळ जेव्हा किनाऱ्याला धडकले त्यावेळी जवळपास 6 तास 381 मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास 15 इंच पाऊस पडला होता. हे वादळ किनाऱ्याला धडकले त्यावेळी त्याचा वेग 330 किमी इतका होता. या वादळाच्या तडाख्यात जवळपास 30 हजार ते 35 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 

द ग्रेट हरिकेन

हुगली रिव्हर चक्रीवादळानंतर द ग्रेट हरिकेन हे दुसऱ्या क्रमांकाचे भयानक वादळ आले होते. 1780 मध्ये हे वादळ बार्बाडोसमध्ये धडकले होते. हे वादळ केप वर्डे आइसलँडजवळ 9 ऑक्टोबरला तयार झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाबाबतची अधिकृत माहितीबाबत मतमतांतर आहेत. हे वादळ मार्टिनक्यू, सेंट ल्युसिया, प्युरेतो रिको आणि डॉमिनिकन रिपब्लिक वरुन पुढे सरकले होते. या वादळात जवळपास 22 ते 27 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 

हैफाँग टायफून 

पॅसिफिक टायफून हे कायम टोकिनच्या आखातात तयार होतात. अशाच प्रकारचे एक वादळ हैफाँग टायफून 1881 मध्ये हैफाँग, व्हिएतनाम आणि स्थानिक किनारपट्टयांवर धडकले होते. या भयानक चक्रीवादळामुळे 30 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा आकडा प्रत्यक्ष वादळात मरण पावलेल्या लोकांचा आहे, पण वादळानंतर पसरलेल्या रोगराई आणि भूकबळीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचीही शक्याता वर्तवण्यात आली आहे. 

गाल्वेस्टोन हरिकेन 

1900 मध्ये टेक्सासला लेवल 4 चे गाल्वेस्टोन हरिकेन धडकले होते. वादळांची नोंद ठेवत येत असल्यापासूनचे हे टेक्सामधील पहिले चक्रीवादळ होते. त्यानंतर 1983 आणि 2008 लाही टेक्सासला वादळाने तडाखा दिला होता. पण, गाल्वेस्टोन हरिकेनने आतापर्यंतची या भागातील सर्वात जास्त हानी केली. या चक्रीवादळात 8 हजार ते 12 हजार लोक मरण पावले होते. त्यावेळी टेक्सासची लोकसंख्या फक्त 38 हजारच्या आसपास होती. 

द ग्रेट भोला चक्रीवादळ 

बांगलादेशाला अनेकवेळा चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. 1970 साली बांगलादेशला धडकलेल्या चक्रीवादळापैकी द ग्रेट भोला चक्रीवादळ हे सर्वात जास्त तीव्रतेचे वादळ होते. या वादळामुळे किनारपट्टीच्या भागाचे स्मशानातच रुपांतर झाले होते. हजारो लोक मरण पावले होते तर अनेक लोकांच्या काहीच थांगपत्ता लागला नव्हता.  

सुरवातीला 11 नोव्हेंबरला या चक्रावादळाचा वेग हा 137 किमी ते 145 किमी होता. त्यानंतर याचा वेग वाढत जाऊन तो 220 किमी प्रतीतास इतका झाला होता. वादळाची एकदमच तीव्रता वाढल्याने कमीतकमी 30 हजार लोकांचा यात मृत्यू झाला. काहींच्या मते हा आकडा 50 हजारा एवढा होता. 

अशाचप्रकारच्या अजून एका वादळाने बांगलादेशला 1991 ला तडाखा दिला होता. त्यात 1 लाख 38 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

सूपर टायफून निना 

हे वादळ फार काळ टिकले नव्हते पण, या वादळाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे त्याला सूपर टायफून संबोधले गेले. निनाने आपला सर्वोच्च वेग हा ताशी 185 किमी इतका नोंदवला होता. हे वादळ तैवान आणि चीनच्या किनारी शहर हुआलिएन वरुन गेले होते. या वादळामुळे बान्किओ आणि शिमांतन धरणे नेस्तनाभूत झाली होती. त्यामुळे सखल भागात अचानक पूर आला होता. निना चक्रीवादळामुळे प्रभावित क्षेत्रात 189.5 मिलीमीटर पाऊस पडला होता. या वादळामुळे जवळपास 1 लाख 71हजार ते 2 लाख 29 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

हरिकेन कॅटरिना 

अमेरिकेला आतापर्यंत बसलेल्या सर्वात मोठ्या चक्रीवादळामध्ये कॅटरिना वादळ हे सर्वाधिक तीव्रतेचे वादळ होते. न्यू ऑरलेन्समध्ये धडकलेल्या 2005 मध्ये कॅटरिना वादळामुळे जवळपास 2 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जरी मृतांचा आकडा कमी दिसत असला तरी अनेक लोकांना या वादळामुळे विस्थापित व्हावे लागले होते. या वादळामुळे जवळपास 108 बिलियन अमेरिकी डॉलर्सचे नुकासान झाले होते. हे जगातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान आहे. 

हरिकेन्स मारिया 

लेवल दोनचे हे मारिया चक्रीवादळ प्युरतो रिकोला 2017 ला धडकले होते. या वादळात जवळपास 1000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांनंतर हा आकडा वाढून 2 हजार 975 झाला होता. कॅटरिना प्रमाणेच या वादळात जिवित हानी कमी झाली असली तरी वित्त हानीचे प्रामाण मोठे होते. या वादळामुळे जवळपास 90 बिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले होते. 

नर्गिस चक्रीवादळ 

2008 मध्ये आलेल्या या वादळामुळे एक शहर, राज्य नाही तर अनेक देशांचे नुकसान झाले होते. आशिया खंडातील 1991 मध्ये बांगलादेशला धडकलेल्या वादळानंतर सर्वात भयानक असे हे नर्गिस चक्रीवादळ होते.  

नर्गिसचा तडाखा हा भारत, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, लाओस, बांगलादेश आणि इतर भागांना बसलो होता. हे लेवल 4 चे वादळ होते. या वादळामुळे जवळपास 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, याचा खरा आकडा हा 10 लाखांच्या वर असल्याचा काहींचा दावा आहे. 

ही जगातील काही चक्रीवादळांची यादी आहे. अजून ज्ञात आणि अज्ञात अशी अनेक वादळे जगाच्या अनेक भागात तयार झाली होती किंवा होणार आहेत. या भयानक वादळापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे. लवकरात लवकर याबाबत इशारा मिळणे आणि त्यानंतर लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहचणे.