Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › International › #MeToo मोहिमेची डोनाल्ड ट्रम्पनी उडविली खिल्ली

#MeToo मोहिमेची डोनाल्ड ट्रम्पनी उडविली खिल्ली

Published On: Oct 11 2018 1:26PM | Last Updated: Oct 11 2018 1:26PMवॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

#MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात जगभरातील महिलांनी आवाज बुलंद केला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली आहे.

या मोहिमेद्वारा माध्यमांकडून लागू केल्या जाणाऱ्या नियमांमुळे आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागत आहे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी पेन्सिलवेनिया येथे मध्यावधी निवडणुकीच्या रॅली दरम्यान केले आहे. 

यावेळी त्यांनी 'द गर्ल दॅट गॉट अवे' या वाक्यप्रचाराकडे इशारा केला. ते म्हणाले की, मी टू नियमांतर्गत मला या वाक्यप्रचाराचा उल्लेख करण्यास परवानगी नाही. कोणीतरी तुमच्यावर प्रेम करत होते. मात्र ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर त्या व्यक्तीवरील प्रेम आणि तिच्या आठवणी व्यक्त करण्यासाठी  'द गर्ल दॅट गॉट अवे' या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो. याच वाक्यप्रचाराचा वापर आपण आता करु शकत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

महिलांनी ठोस पुरावे देण्याची गरज : मेलानिया ट्रम्प 
दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनीही मी टू मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मी टू मोहिमेतंर्गत पुरुषांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिलांनी ठोस पुरावे देण्याची गरज आहे, असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांनी जगभरात मी टू मोहीम चालवली आहे. भारतातील महिलांनीही या मोहिमेच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणा विरोधात आवाज उठविला आहे. या मोहिमेमुळे बॉलिवूड हादरले आहे. हे मोहिमेचे लोण बॉलिवूड पासून राजकारणापर्यंत पोहचले आहे.