ट्रम्प यांनी जॉन बोल्टनना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हटवलं

Published On: Sep 11 2019 11:58AM | Last Updated: Sep 11 2019 11:58AM
Responsive image
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प


न्यूयाॅर्क : वृत्तसंस्था  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर अॅक्टिव्ह असतात. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते आणि प्रतिक्रिया ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडतात. परंतु, मंगळवारी ट्रम्प यांच्या ट्विटने सर्वांना चिंतेत टाकलं. या ट्विटमध्ये जॉन बोल्टन यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हटवण्याचे जाहीर करण्यात आले होते. ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं, ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी शांततेची चर्चा अयशस्वी ठरली.

ट्विटमध्ये ट्रम्प यांनी लिहिले आहे, मी आदल्या रात्री जॉन बोल्टन यांना सांगितले की, व्हाईट हाऊसमध्ये आता त्यांच्या सेवेची आवश्यकता नाही. मी त्यांच्या अनेक सल्ल्यांशी असहमत आहे आणि मी त्यांच्याकडे राजीनामा मागितला होता. त्यांनी सकाळी माझ्याकडे राजीनामा सोपवला. जॉनने जी कामे केली, त्याबद्दल आभार. पुढील आठवड्यात नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या नावाची घोषणा करेन. ट्रम्प यांच्या या ट्विटमुळे चर्चा होत आहे. बोल्टन तिसरे असे एनएसए आहेत, ज्यांना ट्रम्प यांनी पदावरून हटवलं आहे. 

अफगाणिस्तानाच्या मुद्यावरुन संघर्ष

बोल्टन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांच्यामध्ये अफगाणिस्तानच्या मुद्यावरुन नेहमी मतभेद राहिले आहेत. पोम्पियो या समझोत्याच्या विरोधात आहे. पोम्पियो अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा विरोध करीत आहेत. तर बोल्टन यांचे म्हणणे आहे की, कोणताही अंतिम निष्कर्ष न घेता सैन्य परत बोलावले पाहिजे. यासंदर्भात, पोम्पियो यांच्या सहकाऱ्यांनी बोल्टन यांना चर्चेपासून अलिप्त ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत काही सैनिकांना सोडून अन्य सैनिकांना परत बोलावू शकतात, असे बोल्टन यांचे म्हणणे आहे. 

अमेरिकेने अफगाणी विद्रोही संघटनेकडून काबुलमध्ये केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर शांतता चर्चा थांबवली होती. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांसह 12 लोकांचा मृत्यू झाला होता.