Mon, Jul 06, 2020 14:27होमपेज › International › हाँगकाँगप्रश्नी अमेरिकेने चीनची केली कोेंडी

हाँगकाँगप्रश्नी अमेरिकेने चीनची केली कोेंडी

Last Updated: May 28 2020 12:32AM
वॉशिंग्टन : पुढारी वृत्तसेवा

हाँगकाँगमध्ये चाललेल्या स्वायत्ततेच्या लढ्यातील निदर्शकांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेच्या संसदेने विधेयक संमत केले असून मानवी हक्काचे उल्लंघन केल्यास निर्बंध लादू, असा इशारा चीनला दिला आहे. या विधेयकावर येत्या काही दिवसांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सही करतील, अशी शक्यता आहे. 

गेल्या पाच महिन्यांपासून हाँगकाँगमधील नागरिक अधिक स्वायत्तता आणि लोकशाहीचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन संपवण्यासाठी चीन ते चिरडून टाकू शकते अशी भीती आंदोलकांना आहे. 

‘हाँगकाँग ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड डेमोक्रसी अ‍ॅक्ट’ अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांनी या आठवड्यातच संमत केला. याद्वारे एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या या भागाला अमेरिकेच्या कायद्यानुसार विशेष सवलत मिळेल. तसेच चीनकडून त्याला अधिक स्वायत्तता मिळू शकेल. यासंदर्भातील आणखी एक विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केले आहे. ही दोन विधेयके संमत केल्यामुळे चीनचा पारा चढला असून चीनने अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ही दोन विधेयके व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात आली असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावर लवकरच सही करतील, असे सांगितले जाते. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पार पाडली जाईल.  जर या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले तर हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा वर्षातून किमान एकदा आढावा घेतला जाईल. हाँगकाँगमध्ये मानवी अधिकाराच्या उल्लंघनास जबाबदार अधिकार्‍याचा व्हिसा रद्द केला जाईल.  तसेच त्याची मालमत्तादेखील गोठवली जाईल. दरम्यान काही तज्ज्ञांच्या मते, हा कायदा नावापुरताच असेल. 1997 मध्ये चीनने हाँगकाँग ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतःकडे हस्तांतरित केले. त्यावेळी पुढील 50 वर्षांसाठी अधिकाधिक स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन चीनने दिले होते.