Tue, Oct 24, 2017 16:58
29°C
  Breaking News  

होमपेज › International › डोकलामप्रश्‍नी अमेरिका भारतासोबत!

डोकलामप्रश्‍नी अमेरिका भारतासोबत!

Published On: Aug 12 2017 7:46PM | Last Updated: Aug 12 2017 7:46PM

बुकमार्क करा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

भारत-चीनमधील डोकलामप्रश्‍न चिघळल्यास अमेरिका भारताला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे, असे मत अमेरिकन संरक्षण दलातील उच्चस्तरीय अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

भारत-भूतान आणि चीनला सामाईक असणार्‍या डोकलाम भूभागावरील वर्चस्वावरून भारत-चीनध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) डोकलाम भागात रस्त्याचे बेकायदा बांधकाम करण्याचा उद्दामपणा केल्यानंतर भारतीय जवानांनी या कृत्याला विरोध केला आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीनकडून सातत्याने युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकार नियंत्रित चिनी माध्यमांनी तर उतावीळपणा करीत युद्धाचा काऊंटडाऊट सुरू झाल्याचा दावा केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन संरक्षण दलातील तज्ज्ञांनी चीनच्या पोरकटपणाबद्दल नाराजी व्यक्त करीत भारताच्या प्रगल्भपणाचे कौतुक केले आहे. अमेरिकन नौदल युद्ध महाविद्यालयातील तज्ज्ञ जेम्स आर. होल्म्स म्हणाले की, डोकलाम प्रश्‍नावरून भारत-चीनमध्ये गेल्या 50 दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये चीनकडून अधिक प्रगल्भतेची अपेक्षा होती. डोकलामप्रश्‍नी चीनचा पोरकटपणा उघड झाला आहे. हिमालयीन पवर्तरांगांमध्ये भारताशी पंगा घेणे चीनला कठीण जाणार आहे. 

भारताने अतिशय संयत भूमिका घेतली आहे. डोकलाममधून जवान मागे न घेता आणि चीनला कडवे प्रत्युत्तरही न देता भारताने प्रगल्भता दाखवून दिली आहे. चीनने जाणीवपूर्वक डोकलामप्रकरणी वाद ओढवून घेतला आहे. भारतासारख्या कणखर देशावर कुरघोडी करण्याच्या फंदात चीनचाच बालिशपणा उघड झाला आहे. हिंदी महासागरातील हद्दीबाबतचे चीनचे धोरणही उथळच आहे. देशाच्या सीमांचा वाद मिटवू न शकणार्‍या चीनच्या सागरी धोरणाबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहितीही त्यांनी दिली.

डोकलामप्रश्‍नी अमेरिकेची काय भूमिका असेल, या प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्हणाले की, डोकलाम प्रश्‍नात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रयस्थ देशाची मदत घेण्याची शक्यता कमी आहे. मात्र, दोन्ही देशांमधील वाद चिघळलाच तर अमेरिका भारतासोबत जाण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.