Fri, Dec 13, 2019 18:38होमपेज › International › भारताच्या आयात शुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

भारताच्या आयात शुल्कावरून ट्रम्प म्हणाले...

Published On: Jun 27 2019 10:56AM | Last Updated: Jun 27 2019 10:56AM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

जी-२० शिखर परिषदेच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. हल्लीच भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढविले आहे. हे अमेरिकेसाठी स्वीकारार्ह नाही. हे शुल्क रद्द करावे, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.

भारताने यापूर्वी हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर १०० टक्के आयात शुल्क लावले होते. त्यानंतर हे शुल्क ५० टक्क्यांवर आणले गेले. हार्ले डेव्हिडसनसह अनेक अमेरिकी वस्तूंवर भारताने आयातशुल्क लावले आहे. त्यावर ट्रम्प यांनी आता भारताने आयात शुल्क रद्द करण्याबाबतचा सूर व्यक्त केला आहे. याआधीही ट्रम्प यांनी भारताने लावलेल्या आयात शुल्काबाबत टीका केली आहे. हल्लीच ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या मोटरसायकलवर ५० टक्के शुल्क लागू करणे अस्वीकारार्ह आहे, असे म्हटले होते.

हल्लीच भारताने बदाम, अक्रोडसह २९ अमेरिकी वस्तूंवर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. तर अमेरिकेनेही भारतातून आयात होणाऱ्या काही ॲल्युमिनिअम वस्तूंवरील शुल्क वाढविण्याचे ठरविले आहे.

याआधी अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंवरील शुल्क सवलत रद्द केली आहे. त्यामुळे त्याचा फटका भारताला बसला आहे.