पाकिस्तानात अल- कायदाचे तीन दहशतवादी ठार 

Published On: Jun 25 2019 9:10AM | Last Updated: Jun 25 2019 9:10AM
Responsive image


इस्लामाबाद (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमधील कराची येथे झालेल्या चकमकीत अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले असल्याचा दावा येथील पोलिसांनी केला आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक इरफान अली बहादूर यांनी म्हटले आहे की, कराची येथील खुदा बक्स गोठ भागात पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तिघा दहशतवाद्यांना मारले. दहशतवादी लपून बसलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. यादरम्यान त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत दहशतवादी मारले गेले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दोन दहशतवाद्यांनी पलायन केले. 

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून आत्मघाती जॅकेट, स्फोटके, बदुंका, हजारो जिवंत काडतुसे, ग्रेनेड्स आदी शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीदरम्यान मारले गेलेले सर्व दहशतवादी अल-कायदा संघटनेचे आहेत. त्यांचा पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायात सहभाग आहे. अल्पसंख्यांक समुदायातील लोकांची तसेच सुरक्षा रक्षकांची हत्या करणे, परदेशी व्यक्तींचे अपहरण करणे आदी गुन्ह्यांत त्यांचा हात आहे.