Fri, Jul 03, 2020 03:07होमपेज › International › रशियात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

रशियात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

Last Updated: May 28 2020 8:19PM
मॉस्को : पुढारी ऑनलाईन 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या रूग्णांची भारतात गुरूवारी पुन्हा एकदा उच्चांकी नोंद झाली आहे. तर लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्यामुळे हळूहळू रूग्णसंख्येत वाढ होत असलेल्या रशियामध्येही धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अमेरिकेत कोरोना बळींच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. याचा अर्थ, व्हिएतनाम आणि कोरियन युद्धात एकत्रितपणे ठार झालेल्या सैनिकांपेक्षाही अधिक संख्येने अमेरिकी नागरिकांनी प्राण गमावले आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत जगभरात कोरोनाने 58 लाख 24 हजार 635 लोक बाधित झाले असून, 25 लाख 23 हजार 9 रूग्ण बरे झाले आहेत. बळींचा आकडा 3 लाख 58 हजार 178 झाला आहे.  

1.30 अब्ज लोकसंख्येच्या भारतात गुरूवारी पुन्हा एकदा 6 हजार 500 नवे रूग्ण आढळले आहेत. दररोजच्या उच्चांकी रूग्णवाढीने देशातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 58 हजारवर पोचली आहे. त्यातच येत्या रविवारी भारतातील चौथ्या लॉकडाउनची मुदत संपत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याची तयारी करत आहे. 

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केवळ हॉटस्पॉट भागातील लॉकडाउनची मुदत वाढविली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दक्षिण कोरियामध्येही गुरूवारी गेल्या 50 दिवसांनंतर प्रथमच उच्चांकी नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीत विजय मिळवता येऊ शकतो अशा प्रकारचा आदर्श जगासमोर ठेवलेल्या या देशाच्या प्रतिमेला मोठा झटका बसला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी देशात सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य उपाय योजनांची नितांत आवश्यकता असल्याचा इशारा दिला आहे. 

दुसर्‍या बाजूला रशियामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नवे रूग्ण आढळत असल्यामुळे अर्थव्यवस्था खुली करण्याचा धोका अधोरेखित झाला आहे. रशियामध्ये गुरूवारी कोरोनाचे 8,300 पेक्षा अधिक नवे रूग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या 3 लाख 79 हजार झाली आहे. अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर रशियात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. रशियामध्ये आतापर्यंत 4,142 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 101 डॉक्टरांचा समावेश आहे.  लॉकडाउनमधील निर्बंधात शिथिलता आणल्यामुळे रशियातील कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. रशियात गेल्या पंधरा दिवसांपासून 8 हजारपेक्षा अधिक नवे रूग्ण आढळत आहेत.
अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याच्या निर्णयामुळे अन्य आणखी देशांमधीलही परिस्थिती धोक्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

अमेरिकेत लास वेगास कसिनो आणि वॉल्ट डिस्ने वर्ल्ड पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यातच उन्हाळ्याच्या महिन्यांमुळे अमेरिकी नागरिक मास्क न घालताच बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अमेरिकेत कोरोना बळींचा आकडा 1 लाख 2 हजारावर गेला असून, 17 लाख 45 हजारपेक्षा अधिक जण बाधित झाले आहेत. 

अन्य काही देशांत मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. स्पेन आणि इटलीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नवीन रूग्णांची संख्या घटत चालली आहे. चीनमध्ये तर गुरूवारी केवळ दोन नवे रूग्ण आढळले आणि तेही परदेशातील आहेत. न्यूझीलंडमध्ये गेल्या सहा दिवसांपासून एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही आणि देशात आता केवळ आठ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

चाचणी न करताच अनेकांचा मृत्यू

जगभरातील अनेक कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू चाचणी न करताच झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे  कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानले जात आहे. चाचणीचे विविध स्तर दिले गेल्यामुळे आणि काही बळी मोजले न गेल्यामुळे देशांची तुलना करणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे.