काश्मीर प्रश्न : पाक चीनचा डाव फसला 

Published On: Aug 17 2019 10:57AM | Last Updated: Aug 17 2019 11:04AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला काश्मीर मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्नात पाकिस्तान आणि चीन अपयशी ठरला. भारताची कोंडी करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केला, पण अन्य देशांचा पाठिंबा मिळाला नाही. सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना पाकिस्तानने औपचारिक बैठक घेण्यासाठी विनंती केली, पण ती सुद्धा फेटाळण्यात आली होती. 

भारताने आंतरराष्ट्रीय समूदाला कधीच काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करू दिलेला नाही. तो द्विपक्षीय मुद्दा असून उभय देशांमधील चर्चेनेच सोडवला जाईल अशी भूमिका भारताची आजतागायत राहिली आहे. भारताने काश्मीर अविभाज्य भाग असल्याचेही नेहमीच ठणकावून सांगितले आहे.

कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मिरात तणावाचे वातावरण असल्याचा कांगावा करत तसे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि चीनकडून केला गेला. त्यांच्या कांगाव्याला अन्य देशांनी भीक घातली नाही. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी कलम 370 प्रकरणात भारताची जी स्थिती संयुक्त राष्ट्र संघात आधी होती, तीच आताही असल्याचे सांगितले.

कलम 370 रद्द करणे ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि हा निर्णय काश्मीरच्या विकासासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर चर्चा झाल्याने हा एकप्रकारे आमचा विजय असल्याचा दावा केला होता. 

भारताने काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार केल्यानंतर रशियाने खंबीर साथ देत पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर भारताच्या द्विपक्षीय चर्चेचे समर्थन केले.