Tue, Jul 07, 2020 04:35होमपेज › International › ऐतिहासिक! ‘स्पेस एक्स’चे ‘ड्रॅगन’ अवकाशात झेपावले

ऐतिहासिक! ‘स्पेस एक्स’चे ‘ड्रॅगन’ अवकाशात झेपावले

Last Updated: May 31 2020 1:06AM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अंतराळ प्रवासासाठी सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणत आता अमेरिकेतील एक खासगी कंपनी ‘स्पेस एक्स’ने बनवलेल्या यानाच्या सहाय्याने ‘नासा’चे अंतराळवीर बॉब बेनकेन आणि डग हर्ली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. शनिवारी (दि. ३०) रात्री १२ वाजून ५२ मिनीटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) प्रक्षेपण झाले. ‘फाल्कन 9’ या रॉकेटच्या सहाय्याने ‘ड्रॅगन’ या यानातून हे अंतराळवीर रवाना झाले. तत्पूर्वी २७ मे रोजी ते रवाना होणार होते; पण खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. 

फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून या रॉकेटचे प्रक्षेपण झाले. याच ठिकाणाहून अपोलो मोहिमेत नील आर्मस्ट्राँग हे पहिले चांद्रवीर आपल्या ऐतिहासिक प्रवासासाठी रवाना झाले होते. एक दशकानंतर प्रथमच अमेरिकेच्या रॉकेटने आपल्याच भूमीवरून अवकाशात झेप घेतली. कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेत भीषण स्थिती असली तरीही हे प्रक्षेपण नियोजनबद्धरीत्याच पार पडले. 

अमेरिकेने २०११ मध्ये अंतराळयान पाठवणे बंद केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या अंतराळ मोहिमांसाठी रशियाच्या यानांची मदत घेतली जात होती. त्याचा खर्च सातत्याने वाढतच होता. त्यानंतर ‘नासा’ने ‘स्पेस एक्स’ला मोठी आर्थिक मदत देऊन अंतराळ मोहिमेसाठी परवानगी दिली. एलन मस्क यांच्या या कंपनीने २०१२ मध्ये अंतराळात आपले पहिले कॅप्सूल पाठवले होते. या रॉकेटने वीस वेळा अंतराळ स्थानकावर साहित्यसामग्री पोहोचवली आहे. आता ते प्रथमच अंतराळवीरांना घेऊन जात आहे. 

कोरोना प्रकोपामुळे दोन्ही अंतराळवीरांना पंधरा दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. दोघेही बारा दिवस अंतराळात राहतील. त्यासाठी दोघांनीही प्रत्येकी ७१ कोटी रुपये दिले आहेत. या काळात हे दोघे १६ सूर्योदय पाहतील.