द. कोरियाची लॉकडाऊनशिवाय कोरोनावर मात 

Last Updated: Mar 25 2020 11:00PM
Responsive image


सेऊल : पुढारी ऑनलाईन 

तैवाननंतर दक्षिण कोरियाने ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई लढली, ती आज संपूर्ण जगासाठी आदर्श मानली जात आहे. सद्य:स्थितीत दक्षिण कोरिया कोरोना संक्रमित देशांच्या यादीत 8व्या स्थानावर आहे. आतापर्यंत या देशात 9037 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर 3500 पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. केवळ 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. केवळ 59 रुग्ण गंभीर आहेत. मात्र, पहिली अशी स्थिती नव्हती. 8-9 मार्चला 8000 रुग्ण आढळले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत याठिकाणी केवळ 12 नवे रुग्ण आढळले आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, पहिला रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत या देशात लॉकडाऊन झाले नाही किंवा बाजारपेठाही बंद झाल्या नाहीत. 

द. कोरियाचे परराष्ट्र मंत्री कांग युंग वा यांनी सांगितले की, तत्परतेने चाचणी आणि उत्कृष्ट उपचारामुळेच रुग्णांची संख्या मर्यादित राहिली असून बळीही कमी गेले आहेत. आम्ही 600 पेक्षा अधिक तपासणी केंद्रे उघडली आहेत. 50 पेक्षा अधिक चालक केंद्रांवर स्क्रिनिंग केली आहे. रिमोट टेम्परेचर स्कॅनर आणि घशातील द्रव्याची तपासणी केली. यासाठी केवळ 10 मिनिटे लागतील आणि एका तासात अहवाल मिळतील, अशी व्यवस्था केली. आम्ही प्रत्येक ठिकाणी पारदर्शक फोनबुथचे तपासणी केंद्रात रूपांतर केले.  

दक्षिण कोरियामध्ये संक्रमण तपासणीसाठी सरकारने मोठ्या इमारती, हॉटेल्स, पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणांवर थर्मल इमेजिंग कॅमेरे लावले, ज्यामुळे तापाने पीडित व्यक्‍तीची तातडीने ओळख होऊ शकली. रेस्टॉरंटही ताप तपासल्यानंतरच ग्राहकांना प्रवेश देतील, अशी व्यवस्था केली. 

दक्षिण कोरियाच्या विशेष तज्ज्ञांनी लोकांना संसर्गापासून बचावासाठी हाताच्या वापराची पद्धतही शिकवली. यामध्ये जर व्यक्‍ती उजव्या हाताने काम करत असेल तर त्याला मोबाईलचा वापर करणे, दरवाजाचा हँडल पकडणे आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी डाव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला दिला गेला. अशाच पद्धतीने डाव्या हाताने अधिकांश कामे करणार्‍या लोकांना उजव्या हाताचा वापर करण्यास सांगितले. दैनंदिन कामासाठी व्यक्‍ती ज्या हाताचा अधिक वापर करतो, तोच हात सर्वप्रथम चेहर्‍यावरही लावला जातो, त्यामुळे ही पद्धत शिकवण्यात आली. हे तंत्र अतिशय उपयुक्‍त ठरले आणि ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. 

जानेवारीत पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्वप्रथम औषध कंपन्यांच्या साथीत टेस्टिंग किटचे उत्पादन वाढविण्यात आले. दोन आठवड्यांनंतर ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढली, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जलदगतीने टेस्टिंग किट उपलब्ध कसे होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. आज दक्षिण कोरियात दररोज 1 लाख टेस्टिंग किट बनवले जात आहेत आणि 17 देशांमध्ये याची निर्यातही सुरू होणार आहे. 

कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतरही दक्षिण कोरियाने एक दिवसासाठीही बाजारपेठा बंद केल्या नाहीत. मॉल, स्टोअर, छोटी-मोठी दुकाने नियमितपणे उघडली जात होती. लोकांना घराबाहेर पडण्यावर किंवा अन्य हालचालींवरही कोणतेच निर्बंध लादले नाहीत. व्हायरसपासून बचाव कसा करायचा याची सवय दक्षिण कोरियन लोकांना 2005पासूनच आहे, ज्यावेळी एमईएसएस (मिडल ईस्ट रेस्पारेट्री सिंड्रोम) पसरला होता.