Wed, Jun 26, 2019 03:52होमपेज › International › गोळीबाराने न्यूझीलंड हादरले; मशिदीत झालेल्या हल्ल्यात ४९ ठार

गोळीबाराने न्यूझीलंड हादरले; मशिदीत झालेल्या हल्ल्यात ४९ ठार

Published On: Mar 15 2019 8:55AM | Last Updated: Mar 15 2019 3:19PM

ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : येथील मशिदीत झालेल्या गोळीबारानंतर घटनास्थळी पोलिस पोहचले आहेत.ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पुढारी ऑनलाईन

न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील ख्राईस्टचर्च शहरात शुक्रवारी (दि.१५) दोन मशिदीत मोठा हल्ला झाला. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जण ठार झाले असून २० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती न्यूझीलंडचे पोलिस आयुक्त माईक बूश यांनी दिली. हा हल्ला अतिरेक्यांनी केला असून न्यूझीलंडमधील हा काळा दिवस आहे, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. मात्र, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर आयईडी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. ती पोलिसांनी निकामी केली आहे.

या हल्ला ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या अतिरेक्यांनी घडवून आणला आहे, अशी माहिती खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी मशिदीत हल्लेखाराने अंदाधुंद गोळीबार केला त्यावेळी मशिदीत प्रार्थनेसाठी लोकांची गर्दी होती. यावेळी बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूही मशिदीत येत होते. हा न्यूझीलंडमधील सर्वांत मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. 

ही घटना गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस येथील परिस्थिती हाताळत असून अद्याप येथील धोका कमी झालेला नाही, असे सांगण्यात आले आहे.

हल्लेखोरांना केलेल्या गोळीबारात अनेकजणांचा मृत्य झाला आणि सगळीकडे रक्ताचा सडा पडला, असे एका प्रत्यक्षदर्शीने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी, सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, खेळाडूंना या घटनेचा मानसिक धक्का बसला आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबण्याची आम्ही सूचना केली आहे.

बांगलादेशचे सलामीवीर तामिम इक्बाल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, संपूर्ण बांगलादेशी क्रिकेट टीम या हल्ल्यातून बचावली आहे. हा एक भीतीदायक अनुभव असून आमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा. आम्ही दैव बलवत्तर म्हणून वाचलो, असे दुसऱ्या एका खेळाडूने ट्वीट केले आहे.