संरक्षण सामग्रीची निर्मिती मिळून करावी

Last Updated: Nov 08 2019 1:45AM
Responsive image


मॉस्को : वृत्तसंस्था 

संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढविण्यासाठी भारत-रशियाने एकत्रित काम केले पाहिजे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री डेनिस मांतुरोव्ह यांच्यासह संरक्षण उद्योग सहकार्य परिषदेत सिंह सहभागी झाले. या वेळी ते बोलत होते. 

राजनाथ सिंह म्हणाले, दोन्ही देशांनी मिळून संरक्षण सामग्रीचे उत्पादन केले पाहिजे. तसेच या उत्पादनांच्या निर्यातीसाठीही एक व्यासपीठ उभारले गेले पाहिजे. त्यामुळे भारत आणि रशिया या दोन्ही देशांना या व्यापार्‍यात आघाडी घेता येईल. मिग, एके-47 बनविणार्‍या देशांशी संरक्षण सामग्री उत्पादनात भागीदारी करण्याची भारताची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. मेक इन इंडिया प्रकल्पातून रशियाला आमच्या संसाधनांचाही लाभ घेता येणार आहे. 

ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) कंपन्यांच्या प्रमुखांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारत सरकारने उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन डिफेन्स कॉरिडॉर तयार केले आहेत. यात गुंतवणुकीसाठी आम्ही आमच्या सहकार्‍यांना संधी देऊ इच्छितो. आमच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला रशियाच्या आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची गरज आहे. भारतातील लघू आणि मध्यम उद्योगांना रशियाच्या पाठबळामुळे वैश्विक स्तरावर पुरवठादारांच्या साखळीत सहभागी होता येईल. 

याचवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात संरक्षण क्षेत्राबाबत झालेल्या करारानुसार रशियन बनावटीच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी इतर वस्तू बनविण्यात रशिया भारताला मदत करत आहे. यालाही राजनाथ यांनी उजाळा दिला. दरम्यान, राजनाथ सिंह रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांची भेट घेणार आहेत. हे दोन्ही नेते सैन्य सहकार्यावर आधारित 19 व्या भारत-रशिया सरकारी आयोग बैठकीत सहभागी होतील.