...तर हिंसाचार रोखण्यासाठी मिलीटरी नेमणार : ट्रम्प

Last Updated: Jun 02 2020 1:07PM
Responsive image
डोनाल्ड ट्रम्प


वॉशिग्टन : पीटीआय

अमेरिकेत चाललेली हिंसक निदर्शने पोलिसांच्या प्रयत्नाने संपली नाहीत, तर मिलीटरीला बोलावण्यात येईल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. व्हाईट हाऊसमधील रोज गार्डनमधून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी हा इशारा दिलाय. हिंसाचार आणि दंगली शमवण्यासाठी हजारोंच्या संख्येने हत्यारबंद सैनिक, मिलीटरीचे लोक आणि अधिकाऱ्यांची रवानगी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. लुटमार, दंगल, हल्ले आणि विध्वंस थांबवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेत आता गेला आठवडाभर चाललेल्या हिंसक आंदोलनात अब्जावधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली आहे. हिंसक आंदोलकांनी व्यापारी केंद्रे आणि दुकाने, मॉल्स उद्धवस्त करुन लूट केलेली आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येच्या निषेधार्थ ही निदर्शने अमेरिकेत सुरू आहेत. एका पोलिसाने कारवाईदरम्यान फ्लॉईडच्या मानेवर गुडघा रेलून ठेवला होता. तो कळकळीची विनंती करुनही पोलिसाने गुडघा काढला नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. 

यामुळे कायदा आणि सुव्यस्था बिघडली, त्यावर उपाय म्हणून सर्वच गव्हर्नरांना तसेच महापौरांना कडक कारवाईचे आदेश ट्रम्प यांनी दिलेत. रस्त्या-रस्त्यावर राष्ट्रीय गार्ड नेमावेत असे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. हिंसाचार जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत हे करावे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर शहरे आणि प्रांतांनी कारवाईस नकार दिला तर अमेरिकन मिलीटरीला त्यासाठी पाचारण करावे लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला. देश हिंसाचाऱ्यांच्या विळख्यात असून हिंसाचार, लूट, संघर्ष घडवून आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या चाललेले आंदोलन ही शांततापूर्ण निदर्शने नाहीत, तर हा एक प्रकारचा दहशतवाद आहे. यातून निरपराधांचे रक्त सांडत आहे असेही ट्रम्प म्हणालेत. हा माणुसकी आणि देवाच्या विरोधातला गुन्हा असल्याचे मतही त्यांनी मांडले आहे.

जॉर्ज फ्लॉईडबाबत जे झाले ते अत्यंत क्रुर होते. त्याला न्याय मिळेल. आपले प्रशासन आणि कायदा व्यवस्था फ्लॉईडला न्याय मिळवून देईल, त्याचा मृत्यू हा वाया जाणार नाही असेही यावेळी ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे फ्लॉईडच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची लाट उठली. त्यात आंदोलकांनी वॉशिंग्टन डीसीमधील ऐतिहासिक चर्चची मोडतोड केली. तसेच लिंकन मेमोरियलचीही मोडतोड केली. हजारो निदर्शक आंदोलन करत आहेत. राजधानीसह १५० पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यामुळे कर्फ्यू लावावा लागला आहे. सुमारे ६ राज्यात आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे.