Mon, Aug 19, 2019 15:30होमपेज › International › महाराष्ट्रात १४ जागी आज मतदान

महाराष्ट्रात १४ जागी आज मतदान

Published On: Apr 23 2019 1:39AM | Last Updated: Apr 23 2019 1:38AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात मंगळवारी 13 राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा, दादरा व नगरहवेली, दीव व दमण, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक,  ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

सतराव्या लोकसभेसाठीचे मतदान सात टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यापैकी तिसर्‍या टप्प्याचे मतदान आज होईल. या टप्प्यात सर्वाधिक 116 जागांचा समावेश आहे. या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातच्या सर्व म्हणजे 26 जागांवर मतदान होणार आहे. गांधीनगर मतदार संघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केरळमधील वायनाडमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून मुलायमसिंग यादव आदी दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

या राज्यांमध्ये होणार मतदान

गुजरातमधील सर्व 26 मतदारसंघ, केरळमधील 20, कर्नाटकातील 14, उत्तर प्रदेशातील 10, छत्तीसगडमधील 7, ओडिशामधील 5, बिहार आणि पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी 5, आसाममधील 4, गोव्यातील 2, जम्मू काश्ीमर, दादरा व नगरहवेली, दमण आणि दीव, त्रिपुरा येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.