पाकची आर्थिक कोंडी होणार

Published On: Oct 08 2019 1:34AM | Last Updated: Oct 07 2019 11:26PM
Responsive image


इस्लामाबाद : वृत्तसंस्था

टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगप्रकरणी पाकिस्तानची आर्थिक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पाकवर आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना पैसा पुरवित असल्याने पाकचा समावेश करड्या यादीत करण्यात आला होता. यानंतर पाकला सुधारण्याची संधी देण्यात आली होती. एफएटीएफने पाकिस्तानला सुधारण्यासाठी 40 शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी केवळ एका शिफारशीचे पालन पाकला करता आले. बाकीच्या 39 सूचनांकडे पाकने कानाडोळा केल्याचे एशिया पॅसिफिक ग्रुप (एपीजी) या संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. एफएटीएफची बैठक दहा दिवसांनी होणार असून या बैठकीत पाकला काळ्या यादीत टाकण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. ऑक्टोबर 2018 पर्यंत पाकला सुधारण्याची अखेरची संधी देण्यात आली होती. पॅरिसमध्ये 13 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान एफएटीएफची बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या पाकचा समावेश ग्रे लिस्टमध्ये करण्यात आला आहे. या यादीतून नाव काढण्याची मागणी पाकने केली असली तरी या यादीतून

तूर्त पाकचे नाव कमी होण्याची शक्यता धूसरच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानात इसिस, हक्कानी नेटवर्क, लष्करए-तोयबा, जमात-उद-दवा, तेहरिक-ए-तालिबान, फलाह-ई- इन्सानियत फाऊंडेशन आदी दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवाला, स्वयंसेवी संघटना, बिगर लाभ संस्था आदी विविध माध्यमातून दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा होत असल्याचे पाकला पुरावे देण्यात आले आहेत. पाकला मात्र यावर कारवाई करता आलेली नाही.