Sun, May 31, 2020 17:44होमपेज › International › कर्तारपूरमध्ये पाकिस्तानचा बॉम्ब ठेऊन खोडसाळपणा 

कर्तारपूरमध्ये पाकिस्तानचा बॉम्ब ठेऊन खोडसाळपणा 

Last Updated: Nov 12 2019 1:28AM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.९) कर्तारपूर कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. पण, या उद्घाटनापूर्वी एक दिवस पाकिस्तानने नेहमीप्रमाणे खोडसाळपणा केला. आधी खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले पोस्टर लावले होते. त्यानंतर आता त्यांनी कर्तारपूर कॉरिडॉर परिसरात भारतीय हवाई दलाने १९७१ दरम्यानच्या युद्धादरम्यान टाकलेला एक बॉम्ब प्रदर्शनात ठेवला होता. 

कर्तारपूरच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी भारतातून भाविकांचा एक समुह कर्तारपूरला गेला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानने १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी भारतीय हवाई दलाचा कथित एक बॉम्ब प्रदर्शनात ठेवला होता. या भाविकांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने दावा केला होता की हा बॉम्ब भारतीय हवाई दलाने १९७१ मध्ये कर्तारपूर येथे टाकला होता. हा बॉम्ब पाकिस्तानने काचेच्या पेटीत ठेवला होता आणि शिख धर्माचे धार्मिक चिन्ह खांडाने सजवले होते. 

त्यानंतर त्याच्या खाली 'वाहेगुरुजींचा चमत्कार' असे लिहिले होते. तसेच 'भारतीय हवाई दलाने १९७१ च्या युद्धात गुरुद्वारा दरबार साहिब श्री कर्तापूर साहिब उद्धवस्त करण्यासाठी एक बॉम्ब टाकला होता. पण, वाहेगुरुजींच्या आशीर्वादामुळे हा बॉम्ब फुटलाच नाही. हा बॉम्ब श्री खू साहिब (पवित्र विहीर) मध्ये पडला आणि दरबार साहिबची कोणतीही हानी झाली नाही.' अशी माहिती लिहिली होती.    

काही लोकांच्या मते पाकिस्तान पंजाबमधील फुटीरतावादी संघटनांना हवा देण्यासाठी हा सगळा खटाटोप करत आहे. त्यांचा उद्देश भारतातील इतर धर्माच्या आणि शिखांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने कॉरिडॉर परिसरात खलिस्तानवादी नेत्यांची पोस्टर्स लावली होती. याचा भारताने कडक शब्दात निषेध व्यक्त केला होता. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु करण्याचा उद्देश हा शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५० वी जयंती साजरी करणे हा आहे. पण, पाकिस्तान याच्या आडून आपला प्रो खलिस्तानवादी अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करत आहे असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.