Tue, Aug 20, 2019 15:35होमपेज › International › न्यूझीलंडमध्ये लष्करी हत्यारे आणि रायफल्सवर बंदी, पंतप्रधानांची घोषणा

न्यूझीलंडमध्ये लष्करी हत्यारे आणि रायफल्सवर बंदी, पंतप्रधानांची घोषणा

Published On: Mar 21 2019 10:48AM | Last Updated: Mar 21 2019 2:26PM
वेलिंग्टन - वृत्तसंस्था

न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार करुन चाळीस पेक्षा जास्त लोकांचे हत्याकांड घडल्यानंतर तेथील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझिलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी देशभरात लष्करी वापराच्या सर्वच हत्यारांच्यावर तसेच सेमी ऑटोमॅटीक रायफल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व प्रकारच्या रायफल्स उच्चक्षमतेची मॅग्झिन्सवरही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर अशाप्रकारचे स्पेअर पार्ट्स ज्यांचा वापर करुन बंदुकीसारख्या हत्याराची निर्मिती करता येऊ शकते, अशा स्पेअर पार्ट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. न्यूझिलंडच्या पंतप्रधानांनी याबाबतची घोषणा केली आहे.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात शुक्रवारी (दि.१५ मार्च) दोन मशिदीत मोठा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जण ठार झाले होते. २० हून अधिक जखमी झाले होते. त्यावेळी हा हल्ला अतिरेक्यांनी केला असून न्यूझीलंडमधील हा काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी दिली होती.

न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या भीषण नरसंहारामध्ये सात भारतीयांचाही मृत्यू झाला होता. मृतांमध्ये हैदराबादमधील दोन, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील चार व्यक्तींचा समावेश होता. अन्य तीनजण भारतीय वंशाचे होते. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलंगणातील होता. 

त्यावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. मात्र, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले होते. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या टीमला दौरा रद्द करून माघारी बोलावले होते.