‘हाऊडी मोदी’ हुंकारात ‘ह्युस्टन’ हाऊसफुल्ल!

Published On: Sep 23 2019 2:13AM | Last Updated: Sep 23 2019 2:08AM
Responsive image


ह्युस्टन : वृत्तसंस्था

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर स्थानिक भारतीय समुदायाने आयोजिलेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात एकत्र आले. 50 हजारांवर श्रोत्यांनी तसेच लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून टेक्सास प्रांतातील ह्युस्टनच्या या मैदानात पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा हे सगळे रंग अवतरलेले होते... आणि द्राविड, उत्कल, वंगही दंग झालेले होते! भाषाभेद, प्रांतभेद इथे कधीच गळालेले आहेत. ‘भारतीय’ हीच परकीय भूमीत एकमेव अस्मिता शाश्वत राहिली आहे. त्याचाच प्रत्यय ‘हाऊडी मोदी’तून आला.

ह्युस्टन हे भारतीयांचे अमेरिकेतील एक प्रभावक्षेत्र आहे. ऊर्जासंलग्न उद्योगांचे हब असलेल्या ह्युस्टनचा अमेरिकेतील राजकारणावर मोठा प्रभाव आहे, तसा ह्युस्टनमध्ये भारतीयांचा प्रचंड प्रभाव आहे. भारतीय वंशाचे अभियंतेच बहुतांशी इथल्या उद्योगाच्या जाळ्याची घट्ट वीण आहेत. भारतीय वंशाच्या डॉक्टरांचे प्रमाणही इथे लक्षणीय आहे. शहरातील निम्मेअधिक प्रतिष्ठितांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. ‘इंडिया फोरम’ या भारतीयांच्या संस्थेने आपल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात सभेचा सोपस्कार आटोपला, असे नाही! ‘इंडिया फोरम’ने या स्टेडियममध्ये भारतीय परंपरा, भारतीय कला आणि भारतीय संस्कारांचे दर्शन घडवले. कुचीपुडी, भरतनाट्यम, गरबा, भांगडा जोशात सादर केले. स्थानिक गोरे तसेच निग्रोवंशीयांनाही या सादरीकरणातून सहभागी करून घेतले. गायक, नर्तक अशा 400 वर कलावंतांनी आपापल्या आविष्कारांतून भारतीय महत्तेच्या प्रत्ययाला आकार दिला.

प्रेक्षकांमध्ये अर्थातच बहुतांशी भारतीयच होते. एका युवतीने सांगितले, तिचे वडील पुण्याचे आहेत. आई पंजाबी आहे. ती अमेरिकेत राहते आणि ती फक्त भारतीय आहे! काश्मिरी पती असलेल्या एका दुसर्‍या पंजाबी महिलेच्या प्रतिक्रियेचा सूरही असाच होता. 

बुद्धाची करुणा, कुराणातील आयता

सर्वधर्मीय प्रार्थना समूह नृत्याच्या माध्यमातून आवर्जून सादर करण्यात आली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा हिंदूसंदेश, गुरुबाणी, बायबलातील वचने, बुद्धाची करुणा अन् कुराणातील आयता या प्रार्थनेत गुंफल्या गेल्या होत्या. जगाच्या पाठीवरील सर्वच मानववंशातील लोक कलावंतांमध्ये समाविष्ट होते.

मतभेद असूनही जगाला संदेश

आयात शुल्क आणि भारत रशियाकडून शस्त्रखरेदी करीत असल्याने दोन्ही देशांत मतभेद आहेत. असे असूनही ट्रम्प यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून मतभेदांमुळे भारत-अमेरिकेतील संबंधामध्ये फरक पडणार नसल्याची ग्वाही दिली. प्रत्येक क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांसोबत राहणार असल्याचा संदेशही उभय नेत्यांनी जगाला दिला. 

मोदी वाकले, अन् जग झुकले

ह्युस्टनमध्ये एक असा प्रसंग घडला, ज्याचे कवित्व अमेरिकेत संपता संपत  नसल्याची स्थिती आहे. अमेरिकेत मोदींचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांतून तुफान व्हायरल झाला आहे. घडले असे, की ह्युस्टन विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी त्यांना देण्यात आलेल्या पुष्पगुच्छातील एक फूल जमिनीवर पडले. मोदींनी हे लक्षात येताच स्वतः वाकून जमिनीवरील फूल उचलले. पंतप्रधानपदाउपरही मोदींनी माणूस म्हणून स्वत:मध्ये जपलेल्या साधेपणाबद्दल कौतुकाची छटा अमेरिकन लोकांमध्ये उमटलीच... त्यासह मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाबद्दल त्यांची वैयक्तिक बांधिलकीही या लहानशा प्रसंगातून अधोरेखित झाली. एका युजरची प्रतिक्रिया यावर अशी, ‘मोदी आधीच अमेरिकेत घराघरांत पोहोचले आहेत, या प्रसंगाने ते इथे मनामनांत पोहोचले आहेत!’

भारतीय असावा देशासह

‘हाऊडी मोदी’पूर्वीही पंतप्रधानांचे परदेशांतून लक्षणीय असे मेगा इव्हेंट अत्यंत यशस्वीरीत्या पार पडलेले आहेत. मोदींचे हे वैशिष्ट्यच आहे, की ते जेव्हा जेव्हा कुठल्या देशाच्या दौर्‍यावर जातात, त्या देशातील मूळ भारतीयांना ते आवर्जून भेटतात. अनिवासी भारतीयांना संबोधित करतात. भारतीय माणूस, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही राहात असला तरी तो देशासोबत नेहमीच असायला हवा, हाच मोदींचा यामागे हेतू असतो.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची पहिलीच वेळ

एका विदेशी पंतप्रधानांच्या भाषणाला उपस्थित करण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच वेळ होय. या कार्यक्रमाला येण्याआधी ट्रम्प यांनी मोदी यांच्या भाषणासाठी मोठी गर्दी होणार असल्याचे ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत या कार्यक्रमात चांगला वेळ जाईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. भारतीय समुदायामध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांचे समर्थक  आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांतील सुमारे 60 सिनेटर्स उपस्थित होते.

परदेशातील पूर्वीच्या सभा
ऑगस्ट 2015 (दुबई)
मोदी सभास्थळी पोहोचण्यापूर्वी दुबईतील 50 हजार अनिवासी भारतीय एकत्र जमलेले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा एकदा इथेच मोदींची सभा झाली होती. या सभेलाही गर्दी होती.
नोव्हेंबर 2015 (इंग्लंड)
इथे वेंबेल स्टेडियमवर मोदींची सभा झाली होती. 60 हजार श्रोते जमले होते. मोदींसह या कार्यक्रमाला इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून व्यासपीठावर उपस्थित होते.
सप्टेंबर 2015 : (अमेरिका)
भारतीय अभियंत्यांचे एका अर्थाने हब असलेल्या सॅन जोसमध्ये मोदींची जाहीर सभा झाली होती. या सभेला 20 हजार श्रोते हजर होते. कितीतरी अमेरिकन सिनेटर्स मोदींसह व्यासपीठावर होते.
2016 (अमेरिका)
न्यूयॉर्कमध्ये मोदींची पहिली सभा 2014 मध्येच झाली होती. पुढे 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅलीत एका भरगच्च जाहीर सभेत त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले होते.
भारतीयांना संबोधित करण्याची मोदींची तिसरी वेळ
अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करण्याची मोदींची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2014 साली न्यूयॉर्कमध्ये तर 2016 साली सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोदी यांनी भारतीयांना संबोधित केले होते.