पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा दूध महाग

Published On: Sep 11 2019 2:39AM | Last Updated: Sep 11 2019 2:39AM
Responsive image


कराची : वृत्तसंस्था

महागाई आणि आर्थिक तंगीने ग्रासलेल्या पाकिस्तानात खाण्यापिण्याबरोबरच पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे दूध पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाकिस्तानी जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

रोज उठून भारताला अणू युद्धाची धमकी देणार्‍या पाकिस्तानकडे देशाचा कारभार चालवण्यास पैसे नाहीत. महागाईने कळस गाठला आहे. पाकिस्तानात दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढलेल्या असताना मोहरमच्या पार्श्वभूमीवर या किमती आता कल्पनेच्या पलिकडे गेल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या कराची शहरात आणि सिंध प्रांतात एक लिटर दुधाची किंमत एकशे चाळीस रुपये (पाकिस्तानी) झाली आहे. विशेष म्हणजे ही किंमत पेट्रोलपेक्षाही जास्त आहे. पाकिस्तानात सध्या पेट्रोल 117.83 तर डिझेल 132.47 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे. 

पाकिस्तानच्या एक्स्प्रेस न्यूज या वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार मोहरमच्या पार्श्वभूमीवर दूध माफियांनी नागरिकांची अक्षरश: लूट चालवली आहे. मोहरम सणावेळी लोकांमध्ये वाटण्यासाठी मसाले दूध, खीर यांसारखे पदार्थ बनवले जातात. यामुळे दुधाची मागणी वाढली आणि त्यात विक्रेत्यांनी प्रचंड नफेखोरी केली. सरकारने एक लिटर दुधाची किंमत 94 रुपये ठरवून दिली आहे. परंतु, ते कधी 120 च्या खाली मिळतच नाही. मोहरममध्ये तर हा दर 140 रुपयांपर्यंत गेला होता. पाकिस्तानात महागाईने दूध नासले असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दराचाही भडका उडाला आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी या महिन्यापासून सरकारने पेट्रोल दरामध्ये 4.59 रुपये तर डिझेलमध्ये 5.33 रुपये कपात केली.