लंडन, माद्रिद नवी कोरोना केंद्रे

Last Updated: Mar 27 2020 12:39AM
Responsive image


माद्रिद/लंडन/न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

जागतिक आरोग्य आणीबाणी काय असते ते सध्या अवघ्या जगात बघायला मिळते आहे. अवघे जग स्तब्ध झाले आहे. दररोज नव्याने आढळणारी मोठी रुग्णसंख्या आणि मृत्यूची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या मात्र थांबत नसल्याची स्थिती आहे. कोरोना संक्रमणामुळे आजअखेर 25,759 हून अधिक लोक मरण पावले आहेत. दरम्यान, इटलीतील लोंबार्डीतील स्थिती बर्‍यापैकी आटोक्यात आली असून आता लोंबार्डीऐवजी स्पेनमधील माद्रिद व ब्रिटनमधील लंडन ही युरोपातील नवी कोरोना केंद्रे म्हणून समोर आली आहेत.

युरोपमध्ये कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखांवर गेली आहे. एएफपी गणनेनुसार यातले निम्मे बाधित इटली व स्पेन या दोनच देशांतील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार युरोप खंडात 2 लाख 58 हजार 68 लोकांना आजअखेर कोरोनाची बाधा झाली आहे. 14,640 जण मरण पावले आहेत.

आशिया खंडात संक्रमितांची संख्या 1 लाख 937 वर पोहोचली असून, 3,636 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील संक्रमणाची 74,386 प्रकरणे समोर आली असून, स्पेनमध्ये 56,188 लोक संक्रमित आहेत. जगभरातील संक्रमितांचा आकडा 4 लाख 81 हजार 231 वर पोहोचला असून मृतांची संख्या 25,759 वर गेली आहे.

स्पेनमध्ये मृत्यूचे थैमान अजूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. गेल्या 24 तासांतच 655 जण कोरोनाने मरण पावले आहेत. स्पेनमधील मृतांचा आकडा 4,089 वर गेला आहे. बुधवारी स्पेनमध्ये 738 मृत्यू झाले होते. त्यातुलनेत गुरुवारचा आकडा थोडा कमी आहे, एवढेच! स्पेनधमील बाधितांची संख्या आजअखेर 56,188 वर पोहोचली आहे. लोंबार्डीपाठोपाठ माद्रिद, कॅटेलोनियामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. रात्री उशिरा 12 एप्रिलपर्यंत आणीबाणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियात 12 मृत्यू

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाने मरणार्‍यांची संख्या 12 वर पोहोचली आहे. देशात बाधितांची संख्या 2,800 झाली आहे. गत 24 तासांत व्हिक्टोरिया प्रांतात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत 68,572 रुग्ण

चीन आणि इटलीनंतर सर्वाधिक संक्रमण अमेरिकेत झाले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 1,031 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 68,572 लोक बाधित आहेत.

मलेशियातही लॉकडाऊन

मलेशियाचे राजे तसेच राणीसह राजमहालातील 7 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजे सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह आणि त्यांच्या पत्नी तुंकु अजीजा अमीना मैमुना इस्कंदरिया यांनी स्वत:ला आयसोलेटेड (सेल्फ क्‍वारंटाईन) करून घेतले आहे. (ते एकांतवासात आहेत) राजमहालकडून गुरुवारी सांगण्यात आले की, सातही कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलेशियात संक्रमणामुळे आजअखेर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 

चीनमध्ये परदेशांतून कोरोना

चीनमध्ये लागोपाठ दुसर्‍या दिवशी एकही स्थानिक कोरोना बाधित आढळून आला नाही. परदेशातून दाखल झालेल्यांमध्ये मात्र 67 जण बाधित आढळून आले आहेत. या सगळ्यांना आयसोलेट करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

फ्रान्समध्ये संपूर्ण लॉकडाऊन

फ्रान्समध्ये मृतांची संख्या 1, 331 वर पोहोचली आहे. 24 तासांत 231 जण मरण पावले आहेत. आरोग्य अधिकारी जेरोम सोलोेमन यांनी सांगितले, की रुग्णालयात भरती असलेल्या संक्रमितांची संख्या 11,539 आहे. फ्रान्समध्ये 16 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे.