इटलीतील लोंबार्डी बनले कोरोनाचे केंद्र

Last Updated: Mar 25 2020 10:39PM
Responsive image


मिलान/लंडन/माद्रिद/न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

इटलीत गेल्या 24 तासांतच 743 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. इटलीतील कोरोनाबळींची संख्या आजअखेर 6,820 वर पोहोचली आहे. इटलीतील लोंबार्डी शहर कोरोना विषाणूचे नवे एपिसेंटर बनले आहे. कोरोनाने मृत्यूच्या घटनांमध्ये लोंबार्डीने चीनच्या वुहान शहराचा उच्चांक मोडित काढला आहे.

चीनच्या हुबेई प्रांतात मंगळवारपर्यंत कोरोनाने 3160 लोक मरण पावले होते. पैकी 2500 मृत्यू एकट्या वुहान शहरातील आहेत. लोंबार्डीत हा आकडा 3500 वर गेला आहे. जगातील सर्वाधिक मृत्यू लोंबार्डीत झाले आहेत. इथे दर तिसर्‍या दिवसाला मृत्यूचा आकडा दुपटीने वाढतो आहे.

माद्रिद, लंडनमध्येही वाढते मृत्यू

लोंबार्डीपाठोपाठ स्पेनमधील माद्रिद व ब्रिटनमधील लंडन ही शहरे आता कोरोनाची मोठी केंद्रे बनली आहेत. कोरोनाने बळींची संख्या इथे दिवसागणिक वाढते आहे. ‘फायनान्शियल टाईम्स’मधील वृत्तानुसार लंडनमध्ये मृतांचा आकडा दुपटीने वाढतो आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारी 87 लोकांचा मृत्यू झाला, पैकी 21 मृत्यू एकट्या लंडनमधील आहेत. ब्रिटनमध्ये एका आठवड्यात सहापटीने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

स्पेनचे 57 टक्के मृत्यू माद्रिदमध्ये 

स्पेनमध्ये कोरोनाने आजअखेर 2700 वर लोकांचा मृत्यू झाला आहे. 40 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. एकट्या माद्रिद शहरात आजअखेर 12352 संक्रमित समोर आले आहेत. 1535 लोकांचा बळी गेला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण 57 टक्के आहे.

न्यूयॉर्कचा धोका वाढला

अमेरिकेत कोरोनाची 53,852 प्रकरणे आजअखेर समोर आली असून 728 जणांचा बळी गेला आहे. जगभरातील 30 टक्के संक्रमित आता एकट्या अमेरिकेत समोर येत आहेत. आगामी काळात न्यूयॉर्क मृत्यूचे मोठे केंद्र बनू शकते, असा धोका आरोग्य यंत्रणांनी व्यक्‍त केला आहे.