Fri, Nov 24, 2017 20:17होमपेज › International › भारतीय युवकाचा एकट्याचा नवा देश

जगातील नवा देश ‘किंगडम ऑफ दीक्षित’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतातील एका युवकाने स्वत:चा देश तयार केला आहे. तुम्ही म्हणाल ही बातमी इतर काही बातम्यांसारखीच फेक असेल. तर थांबा ही बातमी अगदी खरी आहे. तुम्हाला ऐकण्यास थोडे विचित्र वाटेल पण भारतातील इंदूर येथे राहणाऱ्या सुयश दीक्षित या युवकाने अगदी खरोखर स्वत:च्या देशाची निर्मिती केली आहे. 

काय आहे हा प्रकार
इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये असे एक ठिकाण आहे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. आता याच संधीचा फायदा घेत सुयशने त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली आहे. इतकेच नाही तर त्याने हा प्रदेश म्हणजे एक नवा देश असल्याचे सांगत त्याचे नाव ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असे ठेवले आहे. नव्या देशाची घोषणा सुयशने फेसबुकवर केली आहे. त्याने स्वत:ला या देशाचा राजा घोषित केले आहे. तसेच या देशाचा झेंडा ही सुयशने शेअर केलाय. सुयशने ज्या प्रदेशाचे नाव  ‘किंगडम ऑफ दीक्षित’ ठेवले आहे त्याचे मुळ नाव ‘ताविल’ असे आहे. दरम्यान, सुयशने संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.

नव्या देशासाठी 319 किलोमीटरचा प्रवास
नव्या देशाची घोषणा करताना सुयशने यासाठी 319 किलोमीटरचा प्रवास केल्याचे सांगितले. या ठिकाणी येण्यासाठी निघालो तेव्हा इजिप्तमध्ये दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते. हा प्रदेश संपूर्ण वाळंवटी आहे. 900 स्क्वेअर मीटरचा हा प्रदेश कोणत्याही देशाच्या मालकीचा नाही. मी आता येथे आरामात राहू शकतो, असे सुशयने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या जागेवर झाड लावत असल्याचा फोटो त्याने शेअर केला आहे. 

वडिलांना केले पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख 
नव्या देशाची घोषणा केल्यानंतर सुयशने स्वत:च्या वडिलांची पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. 

वेबसाईटही तयार, देशात अनेक पदे रिक्त अर्ज करण्याचे आव्हान 
सुयशने त्याच्या देशाची https://kingdomofdixit.gov.best देखील तयार केली आहे. माझ्या देशातील अनेक पदे रिक्त आहेत. यासाठी कोणीही अर्ज करू शकते, असे सुयशने म्हटले आहे. 

सुयशच्या आधी जेरमी हीटन नावाच्या व्यक्तीने या प्रदेशावर हक्क सांगितला होता. नव्या देशाला मान्यता मिळावी यासाठी तो संयुक्त राष्ट्र संघाकडे प्रयत्न करतो. आता हे पाहणे उत्सुकतेचे आहे की एवढ्या उचापती केल्यानंतर सुयशला ‘यश’ मिळते का?  

असा आहे ‘किंगडम ऑफ दीक्षित’
देशाची लोकसंख्या- 01
राजधानीचे नाव- सुयशपूर
स्थापना- 05 नोव्हेंबर 2017
राष्ट्रीय प्राणी- पाल (कारण या प्रदेशात सुयशला केवळ पालच दिसली)