होमपेज › International › भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 

भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 

Last Updated: Jan 20 2020 2:14PM
दावोस ( स्वित्झर्लंड) : पुढारी ऑनलाईन

भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती असल्याची बाब समोर आली आहे. देशातील ७० टक्के लोकसंख्येकडे (सुमारे ९५३ दशलक्ष लोक) जेवढी संपत्ती आहे. त्यापेक्षा चारपटीहून अधिक संपत्ती एक टक्के श्रीमंत लोकांकडे आहे. तसेच देशातील ६३ अब्जाधिशांकडे देशाच्या बजेटच्या रकमेपेक्षा जास्त संपत्ती आहे, अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे.

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राईट्स ग्रुप ऑक्सफॅमने 'टाईम टू केअर' नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. जगातील २,१५३ अब्जाधिशांकडे जगातील ६० टक्के लोकसंख्येकडे (४.६ अब्ज) असलेल्या संपत्तीच्या तुलनेत अधिक संपत्ती आहे. जगभरात आर्थिक असमानता वेगाने वाढत असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीमंत अधिक वेगाने श्रीमंत होत आहेत. गेल्या दशकभरात अब्जाधिशांची संख्या वेगाने वाढली असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

वाचा : 'शिवसेनेचा २०१४ मध्येच काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव'

ऑक्सफॅम इंडियाचे सीईओ अमिताभ बेहर यांनी म्हटले आहे की, सरकारकडून जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत श्रीमंत आणि गरिबांमधील दरी कमी होणार नाही. आर्थिक असमानता दूर करण्यासाठी सरकारने गरिबांसाठी विशेष धोरण अंमलात आणले पाहिजे.

वाचा : मुंबईचे ‘नाईट लाईफ’ पडणार लांबणीवर?

या अहवालात लिंग असमानतेचाही उल्लेख करण्यात आला आहे. एका महिला डोमेस्टिक वर्करला एका टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ एवढी कमाई करण्यासाठी २२ हजार २७७ वर्षे लागतील. एका सीईओ एक सेकंदात १०६ रुपयांपेक्षा अधिक कमाई करतो. तो १० मिनिटांत जेवढे कमवतो तेवढे एका महिला डोमेस्टिक वर्करला कमवण्यासाठी एक वर्षे लागतील, असेही अहवालात नमूद केले आहे.