धूर, आग अन् मृत्यूची भीती...

Last Updated: May 23 2020 10:49PM
Responsive image


कराची ः वृत्तसंस्था

विमानाने रनवे सोडून वर आकाशात भरारी घेतली. अवघ्या दहा मिनिटांत पायलटने विमान पुन्हा लँड करण्याची घोषणा केली. त्यानंतर पायलटने विमान उतरण्याचा प्रयत्न केला आणि ही दुर्घटना घडली. त्यामुळे सर्वत्र धूर आणि आगीचे तांडव दिसत होते. मला प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. सर्व बाजूने आग लागली होती. मी लोकांना पाहू शकत नव्हतो, कारण माझ्या चौफेर धूर, आग दिसत होती. माझ्या मनात मृत्यूची छाया गडद होत चालली होती.

मात्र, मी बचावलो. हा अनुभव आहे या दुर्घटनेवर मात करणार्‍या इंजिनियर मोहम्मद जुबैर यांचा.  लाहोरहून कराचीला निघालेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयई) विमान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी कोसळले. या विमानात 99 प्रवासी होते. त्यापैकी 97 प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने दोन प्रवासी आश्‍चर्यकारकरीत्या बचावले. त्यापैकी एक म्हणजे जुबैर.

जुबैर म्हणाले, ईदच्या सुट्टीसाठी मी लाहोरहून कराचीला येत होतो. उडाण घेण्यापूर्वी विमान ठिक होते. पहिल्यांदा लँडिंग होताना आम्हाला दोन-तीन झटके बसले. दुर्घटना घडल्यानंतर मी थोडा वेळ मला काहीच कळले नाही. थोड्या वेळाने मी सीट बेल्ट काढला आणि थोडासा प्रकाश दिसला. मी त्या प्रकाशाच्या दिशेने पुढे आलो. मात्र, विमानातून बाहेर पडण्यासाठी मला दहा फुटांवरून खाली उडी मारावी लागली.

या अपघातातून बचावलेले दुसरे प्रवासी बँक ऑफ पंजाबचे अध्यक्ष जफर मसूद म्हणाले, परमेश्‍वराची कृपा. या अपघातात मसूदचा जीव वाचवणारे अमजद म्हणाले की, विमानाच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाला मी पाहिले. त्याने मला वाचवण्याचे आवाहन केले. मी धावत जात त्यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे पाय दरवाजात अडकले होते. दरम्यान, आपत्कालीन विभागाचे अधिकारी त्याला बाहेर काढण्यासाठी पुढे आले आणि त्यांची सुटका झाली.

विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये काहीतरी चुकीचे...

पीआईएचे मुख्य कार्यकारी एअर व्हाईस मार्शल अर्शद मलिक म्हणाले की, कॅप्टनने एअर ट्रॅफिक टॉवरला माहिती दिली की, विमानाच्या लँडिंग गिअरमुळे आपल्याला काहीतरी चुकीचे वाटते आहे आणि त्यानंतर लगेचच विमान रडारवरून गायब झाले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

सिंधच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, 97 प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोघेजण बचावले आहेत. त्या दोघांची प्रकृती स्थिर असून 19 मृतांची ओळख पटली आहेे. या विमानात 91 प्रवासी आणि 8 क्रू सदस्य होते. निवासी क्षेत्रात विमान अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सर्व जखमी रहिवाशांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात किमान 25 घरांचे नुकसान झाले आहे.