Mon, Jul 13, 2020 00:13होमपेज › International › कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता इबोलाचा उद्रेक 

कोरोनाचा कहर सुरु असतानाच इबोलाचा उद्रेक 

Last Updated: Jun 02 2020 3:31PM
इक्वाटेयुर ( कांगो ) : पुढारी ऑनलाईन 

डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशाच्या सरकारने आज ( दि. २ ) इक्वाटेयुर प्रांतातील वांगाटा भागात इबोला विषाणूचा नव्याने उद्रेक झाल्याचे सांगितले. कांगोच्या आरोग्य मंत्रालयाने वांगाटा भागात आतापर्यंत ६ इबोलाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. तसेच यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ जणांवर उपचार सुरु आहेत, असे सांगितले. 

कांगो सरकारने दिलेल्या माहितीवर जागतिक आरोग्य संघटनेनेही शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी ३ रुग्णांची प्रयोगशाळेतील चाचाणी पॉझिटिव्ह आली आहे, असे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

हायड्रॉक्‍लोराक्‍वीनचा अमेरिकेत वापर सुरूच

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटेनेचे अध्यक्ष टेड्रोस अधहोम घेब्रेसिस यांनी 'या नव्या उद्रेकामुळे लोकांच्या आरोग्याला फक्त कोरोना विषाणूचाच धोका नाही, असा इशारा आपल्याला मिळाला आहे.' असे सांगितले. ते पुढे म्हणाले, 'आमची प्राथमिकता ही कोरोना महामारीलाच आहे. पण, जागतिक आरोग्य संघटना बाकीच्या आरोग्य विषयक समस्यांवरही नजर ठेवून आहे.' 

दाट वस्तीच्या शहरांमध्ये कोरोना सामूहिक संसर्ग 

कांगो देशात १९७६ मध्ये पहिल्यांदा इबोला विषाणूचा शोध लागला होता, तेव्हापासून इबोलाचा कांगोमधला हा ११ वा उद्रेक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आफ्रिका भागाचे संचालक डॉ. मेटशिडिसो मोएती यांनी 'हा उद्रेक सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत झाला आहे. पण, जागतिक आरोग्य संघटना या विषयासंदर्भात भागातील आरोग्य प्रशासनाबरोबर गेल्या २ वर्षापासून काम करत आहे. यामुळे आफ्रिकेतील देश आणि इतर सहकारी या विषाणूच्या उद्रेकाला तोंड देण्याची क्षमता कशी वाढवायची याच्यावर सतत काम करत आहेत.' अशी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, 'स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आपली सहाय्यक टीम पाठवण्याचा विचार करत आहे. ज्या भागात हा नवा उद्रेक झाला आहे तो दळणवळणाचा व्यस्त मार्ग आहे. त्याचा संपर्क शेजारील देशांशीही येतो त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हालचाली करायला पाहिजेत.'

मबांडाका भागात जागतिक आरोग्य संघटना इबोलाच्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी पोहचली आहे. देशात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामही हातात घेण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कांगोमधील अनेक भागात या विषाणूचे अस्तित्व हे प्राण्याचा वावर असलेल्या ठिकाणी आढळून आले आहे.