Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › International › दाऊदच्या मालमत्तेवर टाच

दाऊदच्या मालमत्तेवर टाच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ब्रिटनने मोठा झटका दिला आहे. त्याची ब्रिटनमधील अब्जावधी रुपयांची संपत्ती जप्‍त करण्यात आली आहे. हा आकडा 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. जगभरातील तपास यंत्रणांनी दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली असून मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे हे यश मानले जात आहे.

दाऊदची ब्रिटनमधील मालमत्ता आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय यापूर्वीच ब्रिटन सरकारने घेतला होता. त्यानंतर आता त्याच्या मालमत्तांची जप्‍ती करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये दाऊदची 6.7 बिलियन डॉलर म्हणजे 43 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयामुळे भारताच्या कूटनीतीचा विजय असल्याचे मानले जात आहे. भारताने 2015 मध्ये ब्रिटन  सरकारला दाऊदच्या संपत्तीबाबतचे दस्तऐवज दिले होते. याआधी यूएई सरकारनेही दाऊद इब्राहिमची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्‍यानंतर यूएई सरकारने हे पाऊल उचलले होते.

मोस्ट वाँटेड दहशतवादी

दाऊद हा भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. त्याच्याभोवतीचा फास आवळण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या देशांकडे त्याच्या कुकर्माचे पुरावे भारताने दिले आहेत. 2015 मध्ये ब्रिटनलाही भारताने ही फाईल दिली होती. त्याआधारे तपास करून ब्रिटिश सरकारने दाऊदच्या संपत्तीवर टाच आणली आहे. दरम्यान, ‘फोर्ब्ज’मधील माहितीनुसार दाऊदची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर्स इतकी असून जगातील श्रीमंत गँगस्टर्सच्या यादीत तो दुसरा आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर 150 कोटी रुपयांहून अधिक इनाम ठेवण्यात आले आहे. कोलंबियातील ड्रगमाफिया पाब्लो एस्कोबार या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

पाकमधील पत्ते

दाऊद इब्राहिमला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या वित्तखात्याने एक यादी जाहीर केली होती. त्यात दाऊदचे पाकिस्तानातील तीन पत्ते देण्यात आले आहेत. युनायटेड किंग्डमने जारी केलेल्या असेट्स फ्रीज लिस्टमध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील तीन ठिकाणांचा उल्लेख आहे. या यादीनुसार कासकर दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातील तीन पत्ते असे आहेत. हाऊस नं. 37, गल्‍ली नंबर 30, डिफेन्स हौसिंग अ‍ॅथॉरिटी, कराची, पाकिस्तान, नुराबाद, कराची, पाकिस्तान, व्हाईट हाऊस, सौदी मस्जिदजवळ क्लिफ्टन, कराची.

दाऊदची 21 नावे

ब्रिटनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात दाऊद 21 बोगस नावांनी रहात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये अब्दुल शेख, इस्माईल अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान शेख, मोहम्मद अनिस, इब्राहिम शेख, मोहम्मद भाई, बडाभाई, दाऊदभाई, इक्बाल, दिलीप अजीज इब्राहिम, दाऊद फारूकी शेख, हसन कासकर, दाऊद हसन शेख, इब्राहिम कासकर, इब्राहिम मेमन, दाऊद हसन, दाऊदसाहब, हाजी, सेठ या नावांचा समावेश आहे.