तबलिगींमुळे पाकमध्येही कोरोनाचा फैलाव

Last Updated: Apr 09 2020 10:12PM
Responsive image


लाहोर : वृत्तसंस्था

भारत आणि मलेशियानंतर आता पाकिस्तानातही तबलिगी जमातमुळे कोरोनाचा फैलाव झाल्यावरून जमातवर टीका होऊ लागली आहे. पाकमधील वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार पाकमधील पंजाब प्रांतातील सरकारच्या विरोधानंतरही जमातने 10 मार्च रोजी वार्षिक संमेलन भरवले होते. पंजाब प्रांतातील रायविंड मर्कज येथे हे संमेलन झाले होते. यात सहभागी झालेल्या 404 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, संपूर्ण पाकिस्तानात आतापर्यंत 539 तबलिगींना कोरोनाची लागण झाली आहे. पंजाब प्रांतात आयोजित या मर्कजमध्ये 40 देशांतील तीन हजार लोक उपस्थित होते. पाकने संक्रमण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आपल्या देशात ते परतू शकत नाहीत. तथापि, त्यांच्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे मानले जात आहे. पंजाब प्रांताच्या विशेष शाखेच्या मतानुसार या मर्कजमध्ये 70 ते 80 हजार लोक सहभागी झाले होते. तथापि, जमात व्यवस्थापनाने अडीच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा केला आहे. 

पाकिस्तानात आतापर्यंत 4317 जण संसर्गग्रस्त आढळले असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. जमातचे शेकडो सदस्य पॉझिटिव्ह आढळल्यानतंर रायविंड शहर लॉकडाऊन केले गेले आहे. पंजाब प्रांतातील 36 जिल्ह्यांत मिळून 10 हजार 263 नागरिकांना क्वारंटाईन केले गेले आहे. जमातच्या कार्यक्रमात सहभागी लोकांना ट्रेस केले जात आहे. सरकारच्या निर्देशानंतरही जमातने कार्यक्रम रद्द न केल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेत 6 दिवसांचा कार्यक्रम 3 दिवसांवर आणला. क्वारंटाईन केलेल्यांपैकी 40 टक्के बाधित असू शकतात.