Sun, May 26, 2019 14:38होमपेज › International › मोठ्या हल्ल्यातून बांगलादेश क्रिकेट टीम थोडक्यात बचावली; न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका रद्द

मोठ्या हल्ल्यातून बांगलादेश क्रिकेट टीम थोडक्यात बचावली; न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका रद्द

Published On: Mar 15 2019 10:11AM | Last Updated: Mar 15 2019 10:35AM

file photoख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पुढारी ऑनलाईन

न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात सहाजणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेले बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. मात्र, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या टीमला दौरा रद्द करून माघारी येण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात उद्या, शनिवार (दि.१६) पासून सुरू होणारी कसोटी मालिका रद्द करण्यात आली आहे. या कसोटी मालिकेतील अंतिम सामना हॅगली ओव्हल येथे होणार होता.

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातील बहुतांश खेळाडू ख्राईस्टचर्च येथील मशिदीला भेट देण्यासाठी निघाले होते. ते मशिदीत आत जाणार इतक्यात गोळीबार झाला. सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र, खेळाडूंना या घटनेचा मानसिक धक्का बसला आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबण्याची आम्ही सूचना केली आहे.

बांगलादेशचे सलामीवीर तामिम इक्बाल यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, संपूर्ण बांगलादेशी क्रिकेट टीम या हल्ल्यातून बचावली आहे. हा एक भीतीदायक अनुभव असून आमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा. 

आम्ही दैव बलवत्तर म्हणून वाचलो. अशी घटना पुन्हा कधी घडू नये. आमच्यासाठी प्रार्थना करा, असे मुशफिकूर रहीम खेळाडूने ट्वीट केले आहे.

आम्ही हल्लेखाराच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो. हृदयाची ठोके वाढले होते आणि सगळीकडे भीतीदायक वातावरण होते, असे टीमच्या कामगिरीचे विश्लेषक श्रीनिवास चंद्रशखेरन यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट टीम खेळाडूंच्या संपर्कात असून खेळाडूच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले जात आहेत.