काबूलला लग्न समारंभात बॉम्बस्फोट; ७० जण ठार

Published On: Aug 18 2019 9:11AM | Last Updated: Aug 19 2019 1:23AM
Responsive image
काबुलमध्ये याच ठिकाणी हल्ला होऊन ४० जण ठार झाले.


काबूल : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये दारुलमान परिसरात एका लग्न समारंभात शनिवारी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यात  70 जण ठार झाले; तर 182 जण जखमी झालेले आहेत. याआधी 8 ऑगस्टलाही एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 14 लोक मारले गेले होते.

स्थानिक पत्रकार बिलाल सरवरी यांनी सांगितले की, हा हल्ला ठरवून केला गेला. शिया पंथातील हाजरा समुदायाला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. काबूलच्या दारुलमान परिसरात अल्पसंख्याक शिया हाजरा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. हल्ल्यातील जखमींना जवळच्या रुग्णालयांतून दाखल करण्यात आले आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही.

काबूलमध्ये या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. 8 ऑगस्टच्या हल्ल्यात 8 ठार, तर 145 जखमी झाले होते. या हल्ल्यात पश्चिम भागातील अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांना तालिबानने आपले लक्ष्य केले होते. त्यासाठी मोटारीचा वापर करण्यात आला होता.

अफगाणिस्तानात 28 सप्टेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीवरून अमेरिका आणि तालिबानदरम्यान सुरू असलेल्या चर्चेसोबतच हिंसक घटनाही वाढलेल्या आहेत. तालिबानकडून चर्चेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रियाही अमेरिकेचे प्रतिनिधी खलील जाद यांनी दिली होती. अफगाणिस्तानच्या भूमीला कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा अड्डा बनू देणार नाही, असेही ते म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र चर्चा आणि हिंसक घटना एकाचवेळी सुरू आहेत.