Wed, Feb 26, 2020 08:31होमपेज › International › जगाला तब्बल २० टक्के ऑक्सिजन देणाऱ्या घनदाट ॲमेझॉन जंगलाला आग 

पृथ्वीच्या फुफ्फुसाला भीषण आग 

Published On: Aug 23 2019 3:02PM | Last Updated: Aug 23 2019 5:25PM

तब्बल २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ब्राझीलमधील महाकाय ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाला मागील तीन आठवड्यांपासून आग लागली आहे.साओ पावलो (ब्राझील) : पुढारी ऑनलाईन

जगाला तब्बल २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या आणि पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमधील महाकाय ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाला मागील तीन आठवड्यांपासून आग लागली आहे.  जगभरातून #prayforamazonia हॅशटॅग सुरू करण्यात आल्यानंतर सामान्य लोकांना ॲमेझॉन जंगलाला लागलेली आग किती भयंकर आहे याची कल्पना येऊ लागली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे जगभरातील माध्यमेही याबाबतीत अनभिज्ञ असून ब्राझील सरकारच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Amazon rainforest ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती या जंगलात आढळून येतात. सलग तीन आठवडे ॲमेझॉन जंगल भस्मसात होत असल्याने वातावरणात किती मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड  पसरला असेल याची कल्पनाही करू शकत नाही इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ॲमेझॉनला लागलेल्या वणव्याने भीषण रुप धारण केल्याने पर्यावरणवादी आणि ब्राझील सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. जगातील सर्वात संवेदनशील असलेल्या नैसर्गिक प्रदेशाकडे दूर्लक्ष करणाऱ्या ब्राझील सरकारवर  जगभरातून टीकेचे आसूड ओढले जात आहेत.युरोपसह अनेक देशांनी ब्राझील सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे.

या आगीमुळे ॲमेझॉनपासून हजारो किमी दूर असणाऱ्या साओ पावलो शहरावर अंधारी दाटून आली होती. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील २ हजार ७०० किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. ब्राझीलसह पेरु, बोलिविया आणि पेरुग्वे या देशांमध्येही या वणव्याचा धूर पसरत आहे.

ॲमेझॉन जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी वनजमी गिळंकृत करण्यासाठी आगी लावण्याचे उद्योग केले आहेत. त्यामुळे मोठा वनभाग जमीनदोस्त झाला आहे.  या  सर्व प्रकारावर  वन्यजीव प्रेमींनी आवाज उठवूनही  ब्राझील सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असल्याने अवस्था बिकट झाली आहे. जगाचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेली आग अंतराळातूनही दिसत आहे.