Wed, Nov 14, 2018 10:08होमपेज › Goa › साळ बंधार्‍यात माशेलचा युवक बुडाला

साळ बंधार्‍यात माशेलचा युवक बुडाला

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMहणखणे ः वार्ताहर

पेडणे आणि डिचोली तालुक्यांना   सांधणारा दुवा असलेल्या इब्रामपूर- साळ बंधार्‍यात आंघोळीसाठी उतरलेल्या  प्रताप गावडे (30,रा. माशेल)या युवकाचा रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. दरम्यान, याठिकाणी पोलिसांनी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी उपसरपंच झिलू हळर्णकर यांनी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   आपल्या  मित्रांसह प्रताप गावडे दुपारी 12.30 वाजता बंधार्‍यावर पोचला. दुपारी जेवणानंतर सर्वजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. 3 वाजण्याच्या सुमारास प्रताप गावडे हा आपण पाण्यातून वर जातो ,असे सांगून बाहेर जायला निघाला. पण तो पाण्यातून बाहेर आलाच नाही. काही वेळाने मित्रांनी शोधाशोध केली. परंतु तो सापडला नाही. काहींना संशय आल्याने पाण्यात शोध घ्यायला सुरुवात केली.   दरम्यान, इब्रामपूर येथील सत्यम गवस, दत्ताराम नाईक आणि अमीर हळर्णकर हे प्रतापच्या  शोधासाठी पाण्यात उतरले असता   त्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच प्रारंभी डिचोली पोलिस स्थानकातून पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पेडणे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पेडणे पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी हे घटनास्थळी  दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला. 

साळ आणि इब्रामपूरच्या ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. आता तर येथील पर्यटन स्थळ कायमचे बंद करून लोकांना दिलासा द्यावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.  

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पेडणे पोलिस अधिक तपास करीत आहेत.