Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Goa › कोडली खाणीवर तरुण बुडाला

कोडली खाणीवर तरुण बुडाला

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:43AM

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

वेदान्ताच्या कोडली खाणीवर सपाटीकरण करून रस्ता तयार करण्याचे काम सुरू असताना शनिवारी अचानक डंपाची दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जीप  आणि सपाटीकरणासाठी वापरला जाणारा सुमारे तीस टन वजनाचा रिपर, चालकासह दीडशे मीटर खाली कोसळला. या दुर्घटनेत रिपर चालक मनोज नाईक कळंगुटकर (वय 29, रा. खांडेपार) हा खंदकातील चिखलमिश्रित पाण्यात बुडाला. त्याच्यासाठी पोलिस, नौदल, एनडीआरएफकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

ही दुर्घटना संध्याकाळी 5.45 च्या सुमारास घडली. पिट क्रमांक तीनवर सपाटीकरणाचे काम सुरू होते.  हे काम सुरू असताना डंपरच्या कडेचा काही भाग कोसळू लागला. याचवेळी एक अभियंता काम पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोचला होता. दरड कोसळत असल्याचे पाहून त्याने जीपबाहेर उडी घेतली व स्वतःचा जीव वाचवला.रिपर चालक मनोज नाईक याला डंपर कोसळत असल्याचे समजताच त्याने पटकन् रिपरबाहेर उडी घेतली, मात्र तोपर्यंत दरडीचा मोठा भाग त्याच्यावर कोसळल्याने तो दरडीखाली आला. 

हे खंदक चिखलाने भरलेले  असून त्यात उतरून दोन्ही वाहने आणि मनोज नाईक याचा शोध घेणे शोध पथकासमोर  आव्हान बनले आहे. शोधकार्यासाठी कुडचडे पोलिसांसह अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले आहे. रात्री उशिरापर्यंत चिखलातील पाण्यात शोधकार्य चालू ठेवणे शक्य नसल्याने उशिरा एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी दिली.