Sun, Oct 20, 2019 11:35होमपेज › Goa › अभिनयाची ओढ असणार्‍यांनी गावातच शिकावे 

अभिनयाची ओढ असणार्‍यांनी गावातच शिकावे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अभिनयाची  ओढ असणार्‍यांनी आपल्या गावातच राहून थिएटर शिकावे. उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी मुंबईकडे पावले न वळविता कलाकारांनी अभिनय शिकावा. चांगल्या अभिनेत्यांकडे दिग्दर्शक व चित्रपट स्वत: चालून येतो,असे मत नामवंत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा  यांनी व्यक्त केले.  इफ्फी त शनिवारी मुकेश छाब्रा यांच्या मास्टरक्लास चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छाब्रा यांनी उपस्थितांना ‘चित्रपटांसाठी  कलाकारांचे कास्टिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

मुकेश छाब्रा म्हणाले, चित्रपटातून प्रत्येक भूमिकेशी दिग्दर्शकानंतर सर्वात जास्त जवळचा असतो तो म्हणजे कास्टिंग दिग्दर्शक. चित्रपटात लहानातल्या लहान भूमिका साकारणारा  माणूस फार महत्वाचा असतो व तो माणूस शोधणे हे फार कठीण काम असते.

अनेकदा चित्रपटासाठी कास्टिंग करताना भूमिका जशी असेल तशा कलाकारांच्या शोधात आम्ही असतो. त्यामुळे एखाद्या ऑडिशन मध्ये निवड न होणे म्हणजे त्या कलाकाराला अभिनय येत नाही असे नसते. भूमिकेच्या गरजेप्रमाणे कलाकार निवडले जातात.  चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंग वेळी आपण त्याच्या दिग्दर्शकांपेक्षा कथेवर जास्त अवलंबून असतो. कास्टिंग करताना माणसाच्या चेहर्‍यापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वावर जास्त लक्ष द्यावे लागते. ‘दंगल’ या  चित्रपटाच्या कास्टिंगवेळी आपण 4 हजार हून जास्त मुलींचे ऑडिशन घेतले होते, असेही छाब्रा यांनी सांगितले.

 चित्रपटातील प्रत्येक भूमिकेशी जुळणारा  माणून  शोधण्यासाठी  ऑडिशन्स घेत रहावे लागतात.  माणसाच्या पोर्टफोलिओवर आपण विश्‍वास ठेवत नाही, एखाद्या माणसात अभिनयाचा किडा असेल तर त्याचा पासपोर्ट साईझ फोटो देखील अभिनय ओळखण्यासाठी पुरेसा असतो,असे ही ते म्हणाले. 

 कास्टिंग हे करिअर क्षेत्र म्हणून  निवडायचे असल्यास आपण कोणत्याही कास्टिंग दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम करू शकता, ज्यातून अनुभव मिळतो व योग्य प्रकारे शिकायलाही मिळते ,असा सल्ला देखील  छाब्रा यांनी दिला.