पणजी : प्रतिनिधी
पार्ट्यांची धूम, संगीताचा ठेका, पर्यटकांचा जल्लोष तसेच निरभ्र आकाशातील रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने गोव्यात रात्री 12 वाजण्याच्या ठोक्याला समस्त गोमंतकीय तसेच देशी-विदेशी पर्यटकांनी 2017 ला ‘गुड बाय’ करत 2018 या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. ‘हॅपी न्यू इयर’ म्हणत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नववर्ष स्वागतासाठी दाखल होणार्या देशी पर्यटकांची संख्या आणि वाहने वाढल्याने पर्वरी-पणजीसह विविध प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
ख्रिस्ती बांधवांनी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी चर्च तसेच प्रार्थनास्थळांमध्ये रात्रीच्या वेळी आयोजित प्रार्थनासभांना उपस्थिती लावली. मध्यरात्री 12 वाजता घंटानादात नवेवर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचेे जावो, अशी प्रार्थना करत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
गोवा हे नेहमीच नववर्षाचे स्वागत करण्यासाठीचे देशी-विदेशी पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे 2018 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याकडे 25 डिसेंबरपासूनच पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. यामध्ये विविध बॉलीवूड कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्ती तसेच अतिमहनीय व्यक्तींचा समावेश होता. पर्यटकांच्या भाऊगर्दीत गोवा अक्षरशः हरवून गेला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये विशेषतः किनारी भागात पार्ट्या, संगीत रजनी कार्यक्रमांचे आयोजन केले.
हॉटेल्स हाऊसफुल्ल
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यातील विविध खासगी हॉटेल्स तसेच रेसिडेन्सीमध्येही सर्व खोल्या आरक्षित करण्यात आल्याने ऐनवेळी आलेल्या पर्यटकांना हॉटेलच्या खोल्या मिळाल्या नाहीत. राज्यात 2018 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्या तसेच इतर कार्यक्रमांबरोबरच पर्यटन विकास महामंडळातर्फे खास नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रात्री आयोजित करण्यात आलेल्या सांतामोनिका न्यू इयर क्रुझ बोटीवरील पार्टीला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.