Wed, Mar 20, 2019 23:02होमपेज › Goa › ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरवणार

ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरवणार

Published On: Feb 12 2018 2:10AM | Last Updated: Feb 12 2018 1:53AMवाळपई ः प्रतिनिधी

राज्यातील जनतेला आरोग्याच्या बाबतीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी जनतेला आरोग्याच्या प्रवाहात जोडण्यात येणार आहे. आरोग्य खाते दिवसेंदिवस अधिक सक्षम, सुविधांनी सुसज्ज  करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रयत्न  सुरू आहेत. विशेषतः  ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी हाती घेतलेल्या मिशनचा एक भाग म्हणून  गावोगावी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे,असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. गोमेकॉ,आरोग्य संचालनालय व दतंमहाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगरगाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या उदघाटन सभारंभात बोलताना त्यांनी नागरिकांनी आरोग्य आपल्या दारी अशा उपक्रमांतर्गत सहकार्य करण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे.

यावेळी व्यासपीठावर गोमेकॉ डीन डॉ. प्रदीप नाईक, दंतमहाविद्यालय डीन डॉ. आयरा, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजय दळवी, नगरगाव सरपंच पराग खाडीलकर, वाळपईचे आरोग्य अधिकारी डॉ. गजानन नाईक आदींची खास उपस्थिती होती. यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की नुकत्याच मोटारसायकल अ‍ॅम्बुलन्स याचा मोठ्या प्रमाणावर फायदा जनतेला होणार आहे कारण राज्याच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात आरोग्य सुविधा निर्माण होण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.खास करून ग्रामीण भागातील जनता आपल्या आरोग्याच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे काळजी घेत नाहीत यामुळे कालांतराने त्यांना अनेक गंभीर स्वरुपाच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

अशा प्रकाराची परिस्थिती बदलण्याची गरज आहे व प्रत्येकाने आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. गोमेकॉ डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलताना सांगितले,की आरोग्य खात्याची नवीन संकल्पना नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे यामुळे नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एकूण 590 रुग्णांनी याचा फायदा घेतला पैकी 128 रुग्णांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले आहे.