Fri, Apr 19, 2019 12:07होमपेज › Goa › म्हादई’प्रश्‍नी राजकारण केल्यास गंभीर परिणाम

म्हादई’प्रश्‍नी राजकारण केल्यास गंभीर परिणाम

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:43AM

बुकमार्क करा
वाळपई ः प्रतिनिधी

म्हादई नदीच्या अस्तित्वाबाबत तडजोड करून राजकीय फायद्यासाठी म्हादईचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरणप्रेमी व म्हादई बचाव आंदोलनाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी शनिवारी वाळपई गोसंवर्धन केंंद्रात आम्ही गोंयकार संघटनेतर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात दिला. राजेंद्र केरकर म्हणाले, म्हादईप्रश्‍नी सरकारची भूमिका संशयास्पद आहे. कर्नाटकला पिण्याच्या पाण्याची गरज नाही. कर्नाटकने नियोजन केल्यास बेनहल्ली नदीच्या माध्यमातून अनेक समस्या दूर होऊ शकतात. 

कार्यक्रमाचे निमंत्रक अ‍ॅड. शशिकांत जोशी म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाने विविध प्रकारच्या भूमिका न घेता म्हादईप्रश्‍नी लढ्याला पाठिंबा द्यावा. जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती वाडकर, सगुण वाडकर यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सत्तरी व पिसुर्ले भागात पाण्याची समस्या असताना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात पाणी समस्या निर्माण होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.शिवाजी देसाई म्हणाले, पाणी समस्या दूर करण्यासाठी सरकारने ठोसपणे प्रयत्न केले नाहीत. पाणी नियोजनाबाबत सरकारने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असून जलधोरण जाहीर करावे.
सामाजिक कार्यकर्ते रणजित राणे म्हणाले, म्हादईच्या रक्षणासाठी सत्तरीवासीयांनी गंभीरपणे विचार करून या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारचा गोव्याची बाजू लंगडी करण्यासाठी हा डाव आहे.

म्हादईप्रश्‍नी आंदोलनाच्या विरोधात गेल्यास आमदारांना सत्तरीत प्रवेशबंदी घातली जाईल, असा इशारा यावेळी सर्वांनी दिला. शातांबाई मणेरकर, गोसंवर्धन केद्राचे रामचंद्र जोशी यांनी विचार व्यक्त केले. तुळशिदास काणेकर यांनी म्हादईच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. दशरथ माद्रेकर, अशोक नाईक, गौरेश गावस, सामाजिक कार्यकर्ता स्वाती केरकर, कुळ मुडंकार आदोलनाचे नेते अँड. सत्यवान पालकर यांनी भाषण केले.

व्यासपीठावर आम्ही गोंयकार संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. शशिकांत जोशी, गोसंवर्धन केंद्राचे हनुमंत परब, होंडा जि.प.सभासद सरस्वती वाडकर, पिसुर्ले सरपंचजयश्री परब, पंचायत सदस्य सगुण वाडकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजितसिंह राणे, मधु गावकर, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, अ‍ॅड. सत्यवान पालकर, स्वाती केरकर, गोसंवर्धन केद्राचे  व्यवस्थापक रामचंद्र जोशी, माजी आमदार अशोक परोब, पिसुर्ले पंचायत सदस्य लक्ष्मण गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत परब यांनी केले.