Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Goa › जमिनीच्या मुद्द्यावर जनहितासाठी संघर्ष करणार  

जमिनीच्या मुद्द्यावर जनहितासाठी संघर्ष करणार  

Published On: Feb 12 2018 2:10AM | Last Updated: Feb 12 2018 1:57AMवाळपई ;  प्रतिनिधी

सत्तरीतील करमळी, करंझोळ व इतर भागातील रहिवाशांच्या लागवडी खालच्या जमिनींवर वनखात्याने कब्जा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकांत खळबळ माजली असून याच पार्श्वभूमीवर मंत्री विश्वजित राणे यांनी कंरझोळ येथे भेट देऊन स्थानिक  शेतकर्‍यांशी संवाद साधला. गरज पडल्यास सरकार, राजकारण, सत्ता यांचा  विचार न करता वनखात्याच्या विरोधात संघर्ष करणार , असा इशारा राणे यांनी दिला.

कुमठोळ येथे आयोजित एका खास बैठकीत मंत्री राणे यांनी नागरिकांना पूर्ण पाठिंबा दिला. याप्रसंगी नगरगाव जि. प. सभासद प्रेमनाथ हजारे, सावर्डे सरपंच अशोक च्यारी, भागचे पंचायत सदस्य नारायण गावकर, करमळीचे पंचायत सदस्य पांडुरंग गावकर,  सयाजी देसाई, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, उदयसिंह राणे आदी हजर होते. म्हादई अभयारण्यातील लागवडीखाली येणारी सर्व जमीन अभयारण्य क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच वनहक्क कायदा समितीच्या बैठकांचे आयोजन करुन लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सत्तरीतील जनता ही कष्टकरी असल्याने त्यांच्या लागवडीवर कोणत्याही प्रकाराचे अतिक्रमण आपण सहन करणार नाही.

नखात्याने करमळी, करंझोळ, कुमठोळ भागातील जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे नागरिकांत भीती  पसरली आहे. मात्र लोकांनी  भीती बाळगण्याची गरज नाही. आपण याबाबतीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करणार आहे व वनखात्याच्या अधिकार्‍यांनी कोणत्या कायद्याने ही प्रक्रिया सुरु केली आहे याचा आपण अहवाल मागविणार आहोत, असे  राणे यांनी पुढे सांगितले. 

सध्या याठिकाणी वनखात्याने सर्वेक्षणासाठी खांब  घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र नागरिकांनी सदर खांब  हटवण्यासाठी कोणताही प्रयत्न करू नये. यदाकदाचित वनखात्याने संरक्षण करण्यासाठी सुरुवात केली तर याविरोधात संघर्ष करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरू, असे आश्वासन दिले. यावेळी जि. प. प्रेमनाथ हजारे यांनी काही लोक याविषयावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला. पंचायत सदस्य नारायण गावकर यांनी सदर भागातील रानात वनखात्याची यंत्रणा बिबट्या, किंग कोब्रा सारखे प्राणी आणून सोडत असल्यामुळे भागातील जनतेत भयावह स्थिती निर्माण झाली आहे यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले. सरपंच अशोक च्यारी यांचेही भाषण झाले. विष्णू गावकर यांनी सूत्रसंचालन केले.