Mon, Apr 22, 2019 23:52होमपेज › Goa › उत्पादकांनी दूध ओतले रस्त्यावर  

उत्पादकांनी दूध ओतले रस्त्यावर  

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 12:40AMवाळपई ः प्रतिनिधी

‘सुमुल’ कंपनीच्या दूध संकलन केंद्रातील कर्मचार्‍यांनी दूध खराब असल्याचे कारण पुढे करून दूध स्वीकारण्यास नकार दिल्याने ठाणे येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी  शुक्रवारी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून  ‘सुमुल’च्या धोरणाविरोधात  रोष व्यक्‍त केला.  ‘सुमुल’ कंपनी दूध उत्पादकांची सतावणूक करीत आहे, असा आरोप  दूध उत्पादकांनी केला आहे.   कंपनीची अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब कोटकर यांच्यासह अनेक दूध उत्पादकांनी दिला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी,  ठाणे पंचायत  क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या अनेक दूध व्यावसायिकांनी आपले दूध गोवा डेअरीऐवजी जास्त दराच्या आशेने ‘सुमुल’च्या दूध संकलन केंद्रावर  पुरवणे सुरू केले. दोन वर्षांपासून विनातक्रार दूध घेतले जात होते, मात्र, गेल्या    दोन महिन्यांपासून सदर केंद्रावर दूध खराब असल्याचे कारण देऊन केंद्रातील कर्मचारी दूध घेण्यास नकार देत आहेत. हा प्रकार वारंवार घडत असल्याने भागातील दूध उत्पादक चिंतित होते. दूध खराब नसतानाही ते परत पाठवले जात असल्याची दूध उत्पादकांची भावना होती व त्याबद्दल नाराजी वाढत होती.    

खराब दूध घेऊ शकत नाही, असे कारण पुढे करून शुक्रवारी अनेक दूध उत्पादकांना ‘सुमुल’च्या कर्मचार्‍यांनी परतवून लावल्यामुळे त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून तेथील कर्मचार्‍यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.  या प्रकाराचा आणि कंपनीच्या धोरणाचा निषेध म्हणून अनेक दूध व्यावसायिकांनी आपले आणलेले दूध रस्त्यावर ओतून कंपनीचा निषेध केला. यामुळे ठाणे याठिकाणी मुख्य रस्त्यावर अक्षरशः ‘दूधगंगा’ अवतरली होती. याबाबतची माहिती भागात पसरताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले व ‘सुमुल’ कंपनीच्या एकूण वागणूक व व्यवस्थापनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच आपले नुकसान करून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी कंपनीच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेे.

गेल्या दोन वर्षांपासून हेच शेतकरी ‘सुमुल’ कंपनीला दूध पुरवठा करत आले आहेत, आता दूध खराब कसे, असा सवाल बाळासाहेब देसाई यांनी केला. हेच दूध गोवा डेअरीला दिल्यास तेथे घेतले जाते, असे असताना आमचे दूध खराब कसे, असा सवालही त्यांनी केला.  ‘सुमुल’ कंपनीचे अधिकारी   विवेक यांनी सांगितले की, सदर भागातील दूध खराब होत असल्याने याचा इतर भागातून संकलित केल्या जाणार्‍या दुधावर परिणाम होऊ नये, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. कारण या दुधामुळे इतर दूध खराब होते व वारंवार तपासणी करणे हे कंपनीच्या प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे.